

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ इच्छुक होते. भुजबळ यांचे नाव आघाडीवर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे दिल्लीत जाण्याचे भुजबळ यांचे स्वप्न भंगल्याने आता नाशिक जिल्ह्यातील भुजबळ समर्थकही निराश झाले आहेत.
मंत्री भुजबळांचा मतदारसंघ असणाऱ्या येवला शहर व तालुक्यात सोमवारी (दि. ८) 'साहेब निर्णय घ्या'... अशा आशयाचे पोस्टर झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. येवला शहरातील विविध चौक, प्रमुख रस्ते व सार्वजनिक ठिकाणी हे पोस्टर लावण्यात आले आहेत.
छगन भुजबळांनी मी देखील पक्षाच्या उभारणीसाठी सुरवातीपासून काम केलं आहे. त्यामुळे मलाही इतर नेत्यांप्रमाणे न्याय हवा अशी मागणी करत आपली नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांचे समर्थकही नाराज झालेले दिसत आहेत. त्यांच्या समर्थकांनी पोस्टरद्वारे भुजबळ यांच्यावरील निष्ठा व्यक्त करत त्यांना पुढील राजकीय भूमिकेबाबत निर्णय घेण्याचे आवाहन केल्याचे दिसून येत आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ समर्थकांना त्यांच्या उमेदवारीची अपेक्षा होती. येवल्यात जवळपास वर्षभरापासून पोटनिवडणुकीचे वारे वाहत होते. त्यादृष्टीने समीर भुजबळ हे मतदारसंघात जनसंपर्क वाढवत होते.
आपण केंद्रात गेल्यानंतर समीर यांचे राजकीय पुनर्वसन व्हावे अशी भुजबळांची इच्छा होती. त्यामुळेच राज्यमंत्रिमंडळात समीर भुजबळ यांचा समावेश करावा अशी अट भुजबळांनी घातली होती. मात्र, ती मान्य झाली नाही. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर येवल्यात झळकलेल्या या पोस्टरबाजीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
भुजबळ यांच्याऐवजी पक्षाने राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिल्याने येवला मतदारसंघातील नाराज कार्यकर्त्यानी साहेब निर्णय घ्या..अशी साद भुजबळांना पोस्टर्सच्या माध्यमातून घातली आहे. छगन भुजबळ यांना पक्षात वेगळा न्याय दिला जात असल्याची भावना कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.
या पोस्टरमागे नेमके कोण आहे, ते कुणी लावले याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी येवला तालुक्यातील राजकारणात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. भुजबळ आगामी काळात यावर कोणती भूमिका घेतात. तसेच कार्यकर्त्यांच्या भावनांना कसा प्रतिसाद देतात, याकडे आता राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.