Chhagan Bhujbal News : Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News: छगन भुजबळांची साथ असूनही भाजपला येवल्यात चिंता?

Dr Bharati Pawar : येवल्याचे राजकारण नेहमीच मंत्री छगन भुजबळ विरुद्ध अन्य सर्व असेच राहिले आहे. त्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे विधानसभेला भुजबळ यांना लाखाहून अधिक मते मिळतात. मात्र, येवला विधानसभा मतदारसंघातून भाजपला लोकसभा निवडणुकीत सतत आघाडी मिळत आली आहे.

Sampat Devgire

Dindori Constituency 2024 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येवला विधानसभा मतदारसंघातून भाजपला भरघोस आणि हमखास मताधिक्य मिळते. यंदा भाजपच्या उमेदवार डॉ भारती पवार (Bharati Pawar) यांच्या पाठीशी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचेही बळ होते. असे असताना भाजपला मताधिक्य मिळेल असे म्हणणे धाडसाचे ठरू लागले आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात (Dindori Constituency) महायुतीच्या डॉ भारती पवार उमेदवार होत्या महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्याशी त्यांची लढत होती. अन्य उमेदवारही होते. मात्र त्यांचा कितपत प्रभाव पडेल, हे सांगता येत नाही. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दिंडोरीत मुख्य लढत झाली. या लढतीचे वर्णन प्रबळ भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या केंद्रातील राज्यमंत्री आणि तेवढ्याच प्रभावी डॉ पवार (Bharati Pawar) यांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व केलेला एक सामान्य शिक्षक असे होते. तरीही भाजप या निवडणुकीत मतदान होईपर्यंत चाचपडत होता,असा विरोधकांचा दावा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

येवल्याचे राजकारण नेहमीच मंत्री छगन भुजबळ विरुद्ध अन्य सर्व असेच राहिले आहे. त्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे विधानसभेला भुजबळ यांना लाखाहून अधिक मते मिळतात. मात्र लोकसभेला (Loksabha Election) भाजप येथे गेल्या तीन निवडणुकांमध्ये किमान 50 हजारांचे मताधिक्य घेतो. त्यात मोदी लाट ही प्रमुख असते. यंदा मात्र ही मोदी लाट ओसरल्याचे स्पष्टपणे दिसले. येवला लासलगाव आणि विंचूर या तीन शहरांमध्ये डॉ पवार यांना बरी मते मिळाली.

ग्रामीण भागात शरद पवार (Sharad Pawar) यांची तुतारीच जोरकस वाजली, असे सर्व कार्यकर्ते खाजगीत मान्य करतात. मंत्री भुजबळ भाजपच्या आघाडीत आले. मात्र एक बैठक वगळता ते फारसे सक्रिय दिसले नाही. त्यामुळे त्यांचे स्वीय सहाय्यक सभांमधून भाषण करताना पाहण्याची दुर्दैवी वेळ भाजप (BJP) कार्यकर्त्यांवर आली. कदाचित त्यामुळेच भुजबळ बरोबर असले तरीही, भारती पवार यांना लीड मिळेल का? हे ठामपणे सांगता येत नाही. भाजपचे कार्यकर्ते सध्या त्याचीच आकडेमोड करण्यात सगळेजण व्यस्त आहेत. Bharti Pawar Politics Why BJP doesn't believe in majority even though Bhujbal is right

यंदाच्या निवडणुकीत छगन भुजबळ यांचे विरोधक मात्र अतिशय सक्रिय झालेले दिसले. निफाड तालुक्यातील लासलगावशी संलग्न ४६ गावांमध्ये माजी आमदार कल्याणराव पाटील, जयदत्त होळकर, शिवा सुरवसे हे शिवसेनेचे (Shivsena) नेते अतिशय सक्रिय होते. येवला तालुक्यात मारोतराव पवार, आमदार नरेंद्र दराडे आणि माणिकराव शिंदे हे तिन्ही प्रमुख गट राष्ट्रवादीच्या प्रचारात एकत्र आलेले दिसले. त्यांनी केलेल्या प्रचारात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) झालेली गद्दारी हा विषय होता.

मराठा आरक्षण जुनी पेन्शन योजना आणि कांदा निर्यात बंदी या प्रश्नांनी शेतकरी भाजपवर संतापलेला होता. ते अक्षरशः मतदानाची वाट पाहत होते. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे येवला शहरात सुमारे 38 हजार मुस्लिम विणकर आणि अन्य मतदार आहेत. हे सर्व मतदार अतिशय प्रामाणिकपणे मतदानासाठी बाहेर पडले होते. त्याचा काय परिणाम होईल, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. हे मतदार विधानसभेला (Vidhansabha) भुजबळ यांच्या पाठीशी असतात.

येवला विधानसभा (Yeola Vidhansabha) मतदारसंघात गेल्या वीस वर्षांमध्ये विविध राजकीय स्थित्यंतरे पाहायला मिळाली. त्या सर्वांना भुजबळ यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या खंबीर पाठिंबामुळे यशस्वीपणे तोंड दिले. यंदा भुजबळ यांच्याबरोबर शरद पवार नाहीत. त्याचे काय राजकीय पडसाद व परिणाम होतात, हे या लोकसभा निवडणुकीत काही प्रमाणात दिसून आले.

लोकसभेला भुजबळ यांच्या आघाडीला मतदान म्हणजे भाजपला मतदान असे चित्र होते. त्याला मुस्लिम मागासवर्गीय आणि बहुतांश शेतकरी वर्गातील मतदारांनी नाकारले आहे. मराठा आरक्षण हा देखील त्यात एक घटक आहे. येत्या विधानसभा निवडणुकीला हे चित्र कसे बदलायचे, यासाठी भुजबळ यांना प्रयत्न करावे लागतील. लोकसभा निवडणुकीचा कल हेच सांगून जातो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT