Chimanrao Patil at Parola APMC News, Chimanrao Patil News
Chimanrao Patil at Parola APMC News, Chimanrao Patil News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिवसेनेला एकहाती सत्ता द्या, कोट्यावधीचा निधी आणतो!

Sampat Devgire

पारोळा : गेल्या अडीच वर्षांत सरकार आपले असल्यामुळे एरंडोल (Erandol) व पारोळा (Parola) मतदारसंघात तब्बल पाचशे कोटींचा निधी आणला. तर पारोळ्यातील पाणीपुरवठा योजनेसाठी ४५ कोटींचा निधी आणून आणखी निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेला (Shivsena) एकहाती सत्ता मिळाली, तर कोट्यवधीचा निधी सरकारकडून आणून शहर सुजलाम्-सुफलाम् केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांनी येथे दिली. (Chimanrao Patil News)

ते म्हणाले, गेल्या ३५ ते ४० वर्षांच्या राजकारणात जनतेच्या आशीर्वाद व प्रेमामुळे तीनदा आमदार झालो. जिल्हा बँकेत अध्यक्ष व बिनविरोध संचालक, तसेच अनेक संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत कुणाशीही मतभेद, मनभेद न करता मिळालेल्या पदाला न्याय देत मतदारसंघातील जनतेचे कल्याण, शेतकऱ्यांचे प्रश्‍न, वीज, पाणी आणि सिंचन हे मूलभूत प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले.

येथील कृषी उत्पन्न समितीतर्फे झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. एरंडोलचे जगदीश पाटील, नाना पाटील, नगरसेवक मंगेश तांबे, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक चतूर पाटील यांनी आपल्या मनोगतात आमदार चिमणराव पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच, सरकारने आमदारांची कार्याची दखल घेत त्यांना मंत्रिपद द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या वेळी आमदार पाटील म्हणाले, की सध्या सर्वत्र सुडाचे राजकारण केले जात आहे. त्यामुळे सामान्य माणूस हरविला असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांचा विचार न होता सत्ता हस्तगत करण्यासाठी जो-तो प्रयत्न करीत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात असे राजकारण होत असेल, तर राजकारणाचे भवितव्य वाईट असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच, कल्याणकारी योजना राबविण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न होण्याची गरज असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले. विधानसभेच्या सभागृहात शेतकऱ्यांसाठी आवाज उठवून त्यांना पुरेशी वीज मिळाली तर निश्‍चितपणे उत्पन्न वाढेल, असेही ते म्हणाले.

यावेळी सभापती अमोल पाटील यांनी बाजार समितीच्या कामकाजाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की बाजार समितीवर साडेतीन कोटी कर्ज होते. त्याची परतफेड करून बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवत शेवटच्या बोंडापर्यंत कापूस खरेदी करून जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात इतिहास घडवला. कोरोना महामारीत कोविड सेंटर उभारून सामाजिक बांधिलकी जोपासली. संचालक मंडळांच्या सहकार्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे प्रश्‍न सोडवले जात असल्याचेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

ज्येष्ठ संचालक चतूर पाटील अध्यक्षस्थानी होते. बाजार समिती सभापती अमोल पाटील, उपसभापती दगडू पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. आर. बी. पाटील, शहर प्रमुख अशोक मराठे, शेतकी संघ अध्यक्ष गणेश पाटील, उपाध्यक्ष नाना पाटील, पंकज मराठे, बाजार समितीचे संचालक प्रा. बी. एन. पाटील, प्रेमानंद पाटील, मधुकर पाटील, शेतकरी सहकारी संघ सचिव भरत पाटील, बाजार समिती सचिव रमेश चौधरी, प्रा. डी. बी. पाटील, जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT