Shrirampur Bazar Samiti Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shrirampur News : श्रीरामपूर बाजार समितीत सिनेस्टाइल धुमश्चक्री; सचिवासह नातेवाइकाला मारहाण

Pradeep Pendhare

महेश माळवे-

Shrirampur News : श्रीरामपूर बाजार समितीत सचिव पदाचा पदभार घेण्यासाठी आलेल्या सचिव किशोर काळे यांच्या वाहनाच्या काचा फोडून त्यांना व त्यांच्या नातेवाइकाला मारहाण झाली. ही घटना आज दुपारी दीड वाजता घडली. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात प्रभारी सचिव साहेबराव वाबळे याच्यासह 10 ते 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सिनेस्टाइल घडलेल्या या घटनेची श्रीरामपुरात चांगलीच चर्चा रंगली.

काही कारणांमुळे सचिव किशोर काळे यांना बाजार समितीच्या(Bazar Samiti) सचिव पदावरून हटवण्यात आले होते. या कार्यवाहीला काळे यांनी आव्हान दिले. यात काळे यांच्या बाजूने निकाल लागले. जिल्हा निबंधक व विभागीय आयुक्तांनी यानंतर काळे यांना सचिव पदावर हजर करून घेण्याचा आदेश दिला. या निर्णयाविरोधात सत्ताधारी गटाने सहकार व पणन मंत्री तसेच उच्च न्यायालयात अपिल केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

न्यायालयाने निर्णयाला स्थगिती देण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा आदेश पणन मंत्रालयाला दिला होता. त्यानुसार पणन मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी विभागीय आयुक्तांचे आदेश कायम ठेवले. हा निकाल जिल्हा निबंधकांना दिल्यानंतर पदभार घेण्यासाठीचा काळे यांनी बाजार समितीला अर्ज देत अहवाल सादर केला. काळे यांनी पदभाराचा अर्ज बाजार समितीला दिला, त्यावेळी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी व सहायक निबंधक संदीप रुद्राक्ष हेही कामानिमित्त तिथे उपस्थित होते.

या वेळीही पुरी यांनी अहवाल सादर करण्यासंदर्भात त्यांना सूचना केली. ते गेल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास काळे यांनी इतिवृत्त मागितले असता, ते देण्यास प्रभारी सचिव साहेबराव वाबळे याने नकार दिला. (Crime News) त्यानंतर काळे बाजार समितीच्या बाहेर आले असता, 10 ते 12 जणांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडून त्यांच्यासमवेत असलेले कैलास भणगे यांना मारहाण केली. काळे यांनी तेथून आपला बचाव करत शहर पोलिसांकडे गेले. मारहाणप्रकरणी त्यांनी वाबळे याच्यासह 10 ते 12 जणांविरुद्ध फिर्याद दिली. श्रीरामपूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे.

चुकीच्या कामाला पाठिंबा नाही ...

सभापती सुधीर नवले या सर्व प्रकारावर म्हणाले, आपला चुकीच्या कामाला पाठिंबा नाही. चुकीचे होत असेल तर त्याला पाठीशी घालणार नाही. सहायक निबंधक रुद्राक्ष यांनीदेखील या प्रकारावर चिंता व्यक्त केली. बाजार समिती ही शेतकऱ्यांची मालमत्ता आहेत. सचिव पदावरून मनमानी सुरू आहे. काळे यांचा पदावन्नतीचा, तर वाबळे यांचा पदोन्नतीचा अर्ज पणन मंडळाने फेटाळला आहे. त्यामुळे नियमानुसार प्रक्रिया पूर्ण केली जावी, असे सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT