Vrushali Shinde
Vrushali Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मुख्यमंत्री शिंदे यांच्या सूनबाई वृषाली शिंदे राजकीय मैदानात?

Sampat Devgire

कळवण : येथील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj memorial) स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार (Bhushan Pagar) यांच्या संकल्पनेतून शिवस्मारकाजवळ महाराष्ट्राचा (Maharashtra) मानबिंदू असलेल्या भगव्या शिवध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या शिवध्वज रथयात्रेचा (Rathyatra) शुभारंभ राज्याचे बंदरे मंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या हस्ते श्री सप्तशृंगी निवासिनी गडावर पहिल्या पायरीवर पूजन करुन करण्यात आला. (Shivdhwaj Rathyatra begans from Saptshrinigi Vani Gad)

या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुनबाई वृषाली शिंदे, पालकमंत्री दादा भुसे यांच्या पत्नी अनिता भुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. कळवण शिक्षण संस्थेचे संचालक हेमंत बोरसे, स्वप्निल पगार, अविनाश पगार, योगेश अमृतकार, यतिन सोनजे, धनराज पवार, नरेंद्र वाघ, राजेंद्र आहेर, शरद भामरे यांनी सपत्नीक शिवध्वजाची पूजा केल्यानंतर मान्यवरांनी शिवध्वज रथ यात्रेचा शुभारंभ केला. दादा भुसे, अनिता भुसे व वृषाली शिंदे यांचा सत्कार शिवस्मारक समिती अध्यक्ष भूषण पगार यांनी केला. नाशिकच्या या कार्यक्रमात सौ. शिंदे यांनी भाग घेतल्याने भविष्यात त्या देखील शिंदे गटाच्या राजकारणात सक्रीय होणरा का याची चर्चा होती.

या वेळी उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत माहिती देऊन कामकाजाची सद्यस्थिती शिवस्मारक समिती सदस्य अविनाश पगार, राजेंद्र भामरे, राजेंद्र पगार यांनी दिली.

गडावर ढोलताशा आणि मराठमोळ्या संबळच्या गजरात ‘जय अंबे’चा जयघोष करत शिवध्वज रथाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांनी शिवध्वजाचे स्वागत केले. गडपासून शिवध्वज यात्रा कळवण तालुक्यातील सर्व गाव- वाड्या- वस्तीवर जाणार असून, ५ ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर शिवस्मारक परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत शिवध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पप्पू बच्छाव, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र भामरे, सुनील देवरे, राजेंद्र पगार, कळवण उपनगराध्यक्ष राहुल पगार, माजी नगरसेवक अतुल पगार, नितीन पगार, माजी उपनगराध्यक्ष जयेश पगार आदी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

विनम्रता, परमार्थ व त्याग शिकवणारा हा भगवा ध्वज महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची ओळख अवघ्या देशात ठसवणाऱ्या भगव्या ध्वजाला आपल्या परंपरेत धार्मिक, अध्यात्मिक महत्व आहे. याच कारणांमुळे भूषण पगार यांनी शिवध्वजाची संकल्पना साकारली आहे.

- दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT