Vidya Gaikwad  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Politics : जळगाव महापालिकेच्या आयुक्तांचा बदलीसाठी अर्ज अन् अविश्वास प्रस्ताव स्थगित

Jalgaon News : जळगाव महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव स्थगित करण्यात आला.

कैलास शिंदे :सरकारनामा ब्यूरो

Jalgaon Municipal News : जळगाव महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव स्थगित करण्यात आला. महासभेत प्रस्तावाला पाठीबा देणारे भाजपसह इतर पक्षाचेही नगरसेवक अनुपस्थित असल्याने कोरमअभावी सभा अनिश्‍चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याचे महापौरांनी जाहिर केले. महापालिका आयुक्त गायकवाड यांनी राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडे आपल्या बदलीसाठी अर्ज दिल्याने ही तडजोड झाल्याचीही आता चर्चा आहे.

जळगाव महापालिका आयुक्त गायकवाड या विकासाची कामे करीत नाहीत, असा आरोप करीत भाजप नगरसेवक ॲड. अश्‍वीन सोनवणे यांनी साखळी उपोषण सुरू केले होते. यानंतरही दखल घेतली जात नसल्यामुळे थेट गायकवाड यांच्यावर अविश्‍वास ठराव आणण्यात आला. त्याला भाजपसहित शिवसेना शिंदे गट, शिवसेना (Shivsena) ठाकरे गट व एमआयएमने पाठींबा दिला होता. त्यामुळे जोरदार राजकीय वातावरण तापले होते.

भाजप नगरसेवकांनी आणलेल्या या अविश्‍वास ठरावामुळे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्याशी कोणतीही चर्चा न करता नगरसेवकांनी हा अविश्‍वास ठराव दाखल केल्यामुळे मंत्र्यांचीही कोंडी झाली होती. अखेर सोमवारी महाजन, पाटील व भाजपचे नगरसेवक आयुक्त गायकवाड यांची अजिंठा शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. त्यामध्ये आयुक्त व नगरसेवक यांच्यात समझोता झाला. अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याबाबत निर्णय झाल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.

आयुक्तावर दाखल झालेल्या प्रस्तावावर मतदान घेण्यासाठी महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली महासभेचे सकाळी अकरा वाजता आयोजन करण्यात आले होते. महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त गायकवाड, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.

अविश्वास प्रस्ताव दाखल करणारे भाजप (BJP) नगरसेवक डॉ. अश्‍वीन सोनवणे, ॲड, शुचिता हाडा, रजनी अत्तरदे, महेश चौधरी व शिवसेना शिंदे गटच्या नगरसेवक ज्योती चव्हाण उपस्थित होत्या. नगरसेवक अश्‍वीन सोनवणे यांनी कोरमअभावी सभा तहकुबीची मागणी केली. ॲड शुचिता हाडा यांनी त्याला पाठींबा दिला. याच दरम्यान आयुक्तांनी आपला लेखी खुलासाही सादर केला. महापौरांनी नगरसेवकांच्या प्रस्तावानुसार कोरमअभावी सभा अनिश्‍चत काळासाठी तहकूब करण्याची घोषणा केली.

आयुक्तांच्या बदली अर्जामुळे तडजोड?

गायकवाड व महाजन, पाटील यांची बैठकीत तब्बल तासभर चर्चा झाली. यावेळी आयुक्त गायकवाड यांनी आपली बदली करावी असा अर्ज मंत्र्यांकडे दिला असल्याचे सांगण्यात आले. त्या मुळेच अविश्वास ठरावाबाबत तडजोड झाली असल्याचीही आता चर्चा सुरू झाली आहे. गायकवाड यांनी दिलेल्या आपल्या खुलाश्‍यात आपल्या काळातील शहरातील विकासकामाबाबतची माहिती दिली. तसेच एवढी कामे करूनही मी विकासाच्या कामात खोडा घालीत आहे, असे म्हणणे चुकीचे होईल व असा अविश्वासाचा प्रस्ताव पारित करून प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

त्या कर्माची फळे भोगतील, डॉ. अश्‍वीन सोनवणे

अविश्वास प्रस्ताव दाखल करणारे सोनवणे यांनी सभा तहकुबीवर समाधान व्यक्त केले. पक्षाचे नेते गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार प्रस्तावाबाबत निर्णय घेतला आहे. आम्ही मागणी केल्याप्रमाणे विकास कामे वेगाने करण्याचे त्यांनी आश्‍वासनही दिले आहे. त्यामुळे हा प्रस्ताव स्थगित करण्यात आला. आमचा आयुक्तावर व्यक्तीगत राग नाही, त्यांच्या कामावर राग आहे. 'भगवत गीतेत' भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितल्या प्रमाणे त्यांनी जर चांगले काम केले नसेल तर त्या आपल्या कर्माची फळे भोगतील असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT