Balasaheb Thorat Nilesh Lanke meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat Nilesh Lanke meeting : सुजय विखे अध्यक्ष होताच थोरात लंकेंच्या 'होमग्राऊंडवर'! जिल्हा बँकेतील दोस्ती, राजकारणात कुस्ती?

Balasaheb Thorat visits Nilesh Lanke home turf after Sujay Vikhe becomes Ahilyanagar DCC Bank chairman, sparking fresh political speculation : अहिल्यानगर जिल्हा बँकेत विखे-थोरात सत्तासमीकरण कायम असतानाच काँग्रेस नेत्याकडून नीलेश लंके यांच्या नेतृत्वाचे जाहीर कौतुक; अहिल्यानगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा.

Pradeep Pendhare

Ahilyanagar political news : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तेत भाजपसोबत सहभागी झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात राजकीय मैदानात मात्र खासदार नीलेश लंके यांच्या बाजूने उभे राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर थोरात यांनी थेट खासदार लंके यांच्या हंगा (ता. पारनेर) येथील दिवाळी फराळ कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी लंके यांच्या राजकीय संघर्षाचे भरभरून कौतुक केले. ‘खासदार लंके आता भट्टीतून तावून-सुलाखून निघालेले नेतृत्व आहेत. त्यांनी अनेक संकटांचा सामना केला असून, आता आणखी पुढे गेले पाहिजे,’ अशा शब्दांत थोरात यांनी लंके यांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि सभापती प्रा. राम शिंदे हे दिग्गज नेते एकत्र आले होते. डॉ. सुजय विखे पाटील यांची अध्यक्षपदी, तर थोरात यांचे जावई रणजितसिंह देशमुख यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. निवडीची प्रक्रिया पूर्ण होताच थोरात वाहनात बसून रवाना होऊ लागले.

थोरात निघाल्याची माहिती मिळताच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह संचालक मंडळातील काही सदस्यांनी पुढे येत त्यांना नमस्कार केला. मात्र, थोरात पुढे कुठे जाणार, याची अनेकांना कल्पना नव्हती. काही वेळातच त्यांनी खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या हंगा येथील दिवाळी स्नेहमेळाव्याला हजेरी लावल्याचे समोर आले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या आवारातही राजकीय चर्चांना उधाण आले. जिल्हा बँकेच्या सत्तेत विखे पाटलांसोबत असलेले थोरात राजकीय संघर्षात मात्र लंके यांच्या माध्यमातून विरोधी भूमिका घेणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.

लंकेंनी संघर्षावर पुस्तक लिहायला हवे

हंगा येथील कार्यक्रमात बोलताना बाळासाहेब थोरात यांनी खासदार नीलेश लंके यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. ते म्हणाले, "नीलेश लंके यांचे व्यक्तिमत्त्व वेगळे आणि अभूतपूर्व आहे. सहा विधानसभा मतदारसंघांचा व्याप सांभाळताना ते रात्रंदिवस जनतेसाठी धावत असतात. आम्हीही आमच्या राजकीय कारकिर्दीत जनतेसाठी काम केले; मात्र लंके यांच्याइतकी धावपळ केली नाही."

लंके थकतही नाहीत

लंके झोपत नाहीत आणि थकतही नाहीत. ते कोणत्या एनर्जीची गोळी घेतात, हे त्यांनी सर्वांना सांगावे, अशी मिश्किल टिप्पणीही थोरात यांनी केली. लंके आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मेहनत, माणसे जोडून ठेवण्याची हातोटी आणि संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या कामामागील खरी ऊर्जा जनतेचे प्रेम आहे. लंके यांच्या निवडणुकीतील संघर्षाच्या अनेक कथा ऐकण्यासारख्या आहेत. त्यावर पुस्तक लिहिले, तर त्यातून अनेक शिष्य तयार होतील, असेही थोरात म्हणाले.

पहाटे चारपर्यंत फराळाचे आमंत्रण

स्नेहमेळाव्याच्या भव्य आयोजनाचेही थोरात यांनी कौतुक केले. पहाटे चार वाजेपर्यंत फराळासाठी येण्याचे आमंत्रण दिल्याचा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला. तसेच, जागरण-गोंधळाचा कार्यक्रम ठेवायला काही हरकत नव्हती, अशी मिश्किल टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

पाणीटंचाईच्या संकट गंभीर होणार

राज्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या संकटाबाबतही थोरात यांनी चिंता व्यक्त केली. पारनेर तालुक्यात सध्या शंभर टँकर सुरू असल्याचा उल्लेख करत आगामी काळात जनतेला मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो, असे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत सरकारने आपली जबाबदारी पार पाडत जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे. खासदार म्हणून नीलेश लंके यांचीही जनतेप्रती महत्त्वाची जबाबदारी असून, ते जनतेला निश्चितच आधार देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लंकेंना आरोग्याची काळजी घेण्याचाही सल्ला

लंके यांच्या कामाचे कौतुक करतानाच थोरात यांनी त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्लाही दिला. लोकांसाठी काम करताना वेळच्या वेळी जेवण, पाच ते सहा तासांची झोप आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वतःची काळजी घेतली, तरच जनतेसाठी अधिक चांगल्या पद्धतीने काम करता येईल, असे थोरात यांनी सांगितले.

थोरात जिल्हा बँकेत दोन भूमिकेत

जिल्हा बँकेच्या सत्तावाटपात विखे-थोरात यांच्यातील सहमती कायम असली, तरी लंके यांच्या व्यासपीठावर थोरात यांनी केलेले कौतुक आणि दिलेल्या शुभेच्छांमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. बँकेतील सत्तेची समीकरणे आणि आगामी राजकीय संघर्षातील भूमिका या दोन वेगळ्या असू शकतात, असे संकेत या भेटीतून मिळत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT