Ahmednagar Congress Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Business license fees : व्यवसाय परवाना शुल्क वसुलीचा निर्णय रद्द करण्यासाठी काँग्रेसचे अहमदनगरमध्ये धरणे आंदोलन!

Congress City District President Kiran Kale : शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे मनपा कार्यालयासमोर दोनदिवसीय धरणे आंदोलनास सुरुवात झाली आहे.

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : बाजारपेठेत विविध व्यापारी संघटनांच्या संयुक्त बैठकीत जाहीर केल्याप्रमाणे 200 ते 15 हजार रुपयांपर्यंतचा मनापाकडून आकारण्यात येणारा व्यवसाय परवाना शुल्क वसुलीचा निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीकरिता काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहरातील सुमारे 40 हजार व्यावसायिकांसाठी मनपा कार्यालयासमोर दोनदिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे.

शहरातील व्यापारी, दुकानदारांचा आक्रोश मनपा आयुक्त, नगरसेवक, मनपा पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्यापर्यंत काँग्रेस पोहोचविणार असल्याचे या वेळी बोलताना काळे यांनी सांगितले आहे.

विशेष म्हणजे शहरात एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात बळकट होत असताना, आता शहर काँग्रेसने महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेत ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार शिवालयात जाऊन शिवसेनेचे दिवंगत मंत्री अनिल राठोड यांना अभिवादन करून धरणे आंदोलनाला सुरुवात केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाजारपेठा बंद करू नका -

आधीच कोणत्याही कारणावरून बाजारपेठ बंदची हाक वारंवार दिली जाते. समाजमाध्यमांवर तसे संदेश फिरतात. यामुळे ग्राहक बाजारपेठेकडे फिरकत नाहीत. व्यावसायिकांचे नुकसान होते. त्यामुळे धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी बाजारपेठ, दुकाने बंद ठेवू नयेत. आपला धंदा बंद ठेवून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये. आंदोलनस्थळी व्यापाऱ्यांनी गर्दी करू नये. त्यांनी आपले व्यावसायिक नुकसान न करता आपला व्यवसाय सुरू ठेवत आंदोलनातील सहभाग कायम ठेवावा, असे आवाहन काळे यांनी केले आहे.

शहरातील व्यावसायिकांच्या धंद्यावर सततचे बंद आणि कोरोना काळानंतर झालेला विपरीत परिणाम पाहता इथून पुढील काळात शहरात बाजारपेठ बंदला काँग्रेसचा विरोध असल्याचे काळे या वेळी स्पष्ट केले.

व्यापारी संघटनाची झाली एकजूट -

शनिवारी रात्री बाजारपेठेतील सप्तक सदन बँक्वेट हॉल येथे शहरातील विविध व्यावसायिक व्यापारी संघटना, असोसिएशनची संयुक्त बैठक पार पडली होती. या वेळी सर्व संघटनांच्या प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीतच शहर काँग्रेसने किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे निर्णय आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आला.

बैठकीला एमजी रोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शामराव देडगावकर, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर, अहमदनगर होलसेल कापड असोसिएशनचे सचिव राजेंद्र गांधी, इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्यूटर असोसिएशनचे वसंत शहा, ऑप्टिकल्स असोसिएशनचे सागर मुळे, फुटवेअर असोसिएशनचे नेमीचंद गोयल, होलसेल मेडिकल असोसिएशनचे अशोक बलदोटा, सराफ बाजार असोसिएशनचे पांडुरंग दहिवाळ आदी उपस्थित होते.

व्यापाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी काही लोक.... -

''व्यावसायिक म्हणजे सोन्याची कोंबडी वाटतात. शासन शॉप ॲक्ट लायसन शुल्क गेल्या अनेक वर्षांपासून घेत आहे. व्यावसायिक ते भरतात मग ते दिल्यानंतर पुन्हा त्याच कारणासाठी व्यावसायिक परवा शुल्क का म्हणून त्यांनी द्यायचे ? मनपा महासभेत नगरसेवकांनी आवाज उठवायला हवा होता. त्यावेळी ते शांत बसले,'' असं काळे म्हणाले.

याशिवाय, '' आता काही लोक पत्रकबाजी करून अकलेचे तारे तोडत आहेत. हेच त्यांनी सभागृहात हा जाचक निर्णय होत असताना त्याला विरोध दर्शवला असता तर त्याचे स्वागत केले असते. त्यामुळे व्यापाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी काही लोक सुपारी घेऊन काम करीत आहेत. व्यापाऱ्यांचे यामुळे नुकसान करण्याचा डाव काही लोकांचा आहे,'' असा आरोप या वेळी काळे यांनी केला.

स्थायी समिती व महासभेचा ठराव पायदळी तुडवणार -

धरणे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी नगरसेवकांच्या स्थायी समिती व महासभेने पारित केलेला व्यापाऱ्यांवर अन्याय करणारा व्यवसाय परवाना शुल्क वसुलीचा जाचक ठराव काँग्रेस कार्यकर्ते पायदळी तुडवून मनपा प्रशासनाचा निषेध करणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT