Dr. Shobha Bacchav Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress Loksabha Politics : धुळ्यातील राजीनाम्याकडे काँग्रेसचा कानाडोळा?... 'हे' आहे कारण

Sampat Devgire

Dhule constituency 2024: धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली. त्याचे पडसाद या मतदारसंघात उमटायला सुरुवात झाली आहे. दोन जिल्हाध्यक्षांसह त्यांच्या समर्थकांनी आपले राजीनामे पक्ष नेत्यांकडे पाठवले आहेत. त्यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेस श्रेष्ठींच्या निर्णयानुसार ही उमेदवारीची सूचना होती. राज्याचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मतदारसंघातील आढाव्यानुसार डॉ. बच्छाव (Shobha Bachhav) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या मतदारसंघात धुळ्याचे श्याम सनेर आणि नाशिकचे डॉ. तुषार शेवाळे हे अन्य इच्छुक उमेदवार होते. या दोघांनीही आता पक्षाने बाहेरचा उमेदवार दिल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आपले राजीनामे पाठविले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे. (Congress Loksabha Politics News)

या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या राजीनाम्याची पक्षाच्या वरिष्ठांनी दखल घ्यावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. सनेर हे काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेलेल्या अमरीशभाई पटेल यांचे समर्थक मानले जातात. त्यांच्यावर अमरीशभाई पटेल यांचा शिक्का आहे. याची चर्चा खुद्द त्यांच्या समर्थकांनी घेतलेल्या बैठकीत झाली. उमेदवारी जाहीर होण्याच्या दिवशीच सनेर यांच्या समर्थकांची बैठक झाली. त्यात सनेर यांना उमेदवारी दिल्यास तन-मन-धनाने कार्यकर्ते काम करतील आणि त्यांना पूर्णतः विजयी करतील असा दावा करण्यात आला होता.

असाच आक्षेप डॉ. शेवाळे यांच्याबाबत देखील घेण्यात आला होता. गेले पंधरा दिवस उमेदवार कोण यावर खल सुरू होता. त्यानंतरच डॉ. बच्छाव यांच्या उमेदवारीचा विचार झालेला आहे. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ धुळ्यातील नेत्यांनी दिलेल्या राजीनाम्याचा कितपत गांभीर्याने विचार करतील, याबाबत अनेकांना शंका आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासंदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी याबाबतची माहिती मिळाली आहे. पक्षाच्या वरिष्ठांची याबाबत चर्चा केली जाईल. राजीनामे दिलेल्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न मी करणार आहे. पक्षाला येत्या लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळावे, यासाठी नाराजी सोडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

थोरात यांनी राजीनामे दिलेल्या पदाधिकाऱ्यांबाबत गांभीर्याने दखल घेतली आहे. मात्र पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात भिन्न मतप्रवाह आहेत. त्यामुळे या राजीनाम्याची दखल किती गांभीर्याने घेतली जाईल, याबाबत कार्यकर्ते चर्चा करीत आहेत.

(Edited By: Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT