Anil Gote Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Anil Gote News : ‘मराठा’ आंदोलनाला बदनाम करण्यासाठी कटकारस्थान रचले!

Sampat Devgire

Maratha Andolan News : ज्या पद्धतीने मराठा समाजाचे शांततापूर्ण आंदोलन सुरू होते, त्याबाबत सरकार त्यांच्याशी चर्चा देखील करीत होते. असे असताना अचानक व अत्यंत क्रूरपणे त्यांच्यावर लाठीमार व गोळीबाराचा प्रकार घडला. त्यावर विश्वास बसत नाही. याबाबत सरकारला किंमत मोजावी लागेल, असा इशारा ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी दिला आहे. (Senior leader Anil Gote criticize State Government & Police on Maratha issue)

राज्य सरकारने (Maharashtra Government) पोलिस (Police) बळाचा वापर करून शांततापूर्ण मराठा (Maratha) आंदोलन चिघळवले आहे. हे मोठे कारस्थान आहे. राज्य सरकारच त्याला जबाबदार आहे.

याबाबत गोटे यांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख टालत त्यांच्यावर टिका केली. ते म्हणाले, मराठा समाजाच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी आंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे लाठीहल्ल्याचे कारस्थान करण्यात आले. पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना अविश्वसनीय आणि कपोलकल्पित आहे. बंद, मोर्चे, उपोषण अशा लोकशाहीमूल्यांवर विश्वास नसलेल्या हुकूमशहाला खुश करण्यासाठी हा लाठीहल्ला झाला आहे.

श्री. गोटे यांनी पत्रकात म्हटले आहे, की मराठा समाजातील दोन दिग्गज नेते असताना पोलिस अमानुष लाठीहल्ला करूच कसे शकतात. कपटी आणि कारस्थानाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न बोलता नेमके दर्शन घडवून दिल्याचा आरोप आहे.

मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी लाखोंचे मोर्चे काढले. कुठे खुट्ट झाले नाही, गालबोट लागले नाही. श्री. फडणवीस यांनी पाच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात कबूल करुनही धनगर समाजासकट मराठा समाजास आरक्षण दिले नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाचा अहवाल विधिमंडळात येऊ दिला नाही. त्याचवेळी मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन २०१९ च्या निवडणुकीसाठीची आपली मते सुरक्षित करून घेतली.

धनगर समाजाला गाजरांच्या शेतात सोडून दिले. मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन मराठा समाजाचे दिग्गज नेते असताना पोलिस अमानुष लाठीहल्ला करूच कसे शकतात, असा प्रश्‍न श्री. गोटे यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT