Malegaon News: मालेगाव बाह्य मतदार संघ शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मंत्री दादा भुसे यांच्या उमेदवारीमुळे चर्चेत आहे. या मतदारसंघात मंत्री भुसे यांचे प्रतिस्पर्धी ईर्षेने प्रचारात उतरले आहेत. विरोधकांच्या शक्ती प्रदर्शनामुळे ही निवडणूक चर्चेचा विषय झाली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार आणि मंत्री भुसे यांचे गेली वीस वर्षे विश्वासू सहकारी व प्रचार प्रमुख राहिलेल्या अपक्ष उमेदवार बंडू काका बच्छाव यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन केले. श्री बच्छाव यंदा भुसे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी करीत आहेत.
मंत्री दादा भुसे यांचे बलस्थान आणि कमकुवत मुद्दे याची बारीक सारीक माहिती असलेले श्री. बच्छाव या निवडणुकीत अतिशय जोमाने प्रचार करीत आहेत. मालेगाव शहरातील भुसे यांचे सगळेच विरोधक बच्छाव यांना जाऊन मिळाले आहेत.
भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघात भुसे यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी केल्यामुळे महायुतीचा घटक असलेल्या भुसे यांना त्याची अडचण होऊ शकते. भाजप श्री. भुसे यांच्या व्यक्ती केंद्रीत राजकारणाने नाराज आहे.
कधीकाळी कर्मवीर (कै) भाऊसाहेब हिरे यांच्या उमेदवारीमुळे राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या दाभाडी (मालेगाव बाह्य) मतदारसंघात गेली वीस वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून उमेदवारी करणारे भुसे यंदा शिवसेनेत बंडखोरी करून शिंदे गटाला जाऊन मिळाले. ही सल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांमध्ये आहे.
शिवसेना ठाकरे गटाने आपली सर्व ताकद हिरे कुटुंबीयांच्या मागे उभी केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे या मतदार संघातून उमेदवारी करीत आहेत. श्री हिरे यांना संस्था आणि नातीगोती या माध्यमातून पाठिंबा देणारा मोठा वर्ग मालेगाव बाह्य मतदारसंघात आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रत्येक निवडणुकीत येथे हिरे कुटुंबीयांचा उमेदवार विधानसभा निवडणुकीत असतो. गेली निवडणूक त्याला अपवाद होती. त्यामुळे यंदा हा मतदारसंघ पुन्हा हिरे कुटुंबीयांकडे खेचण्यासाठी हिरे समर्थक कामाला लागले आहेत.
मंत्री भुसे यांचे विश्वासू सहकारी बंडू बच्छाव यांच्यामुळे होणाऱ्या मत विभागणीमुळे वेगळ्याच काही निकाल लागतो का याची सगळ्यांना उत्सुकता आहे. यासंदर्भात तिन्ही उमेदवारांसाठी ही निवडणूक आपल्या राजकीय अस्तित्वासाठी प्रतिष्ठेची आहे.
त्यामुळे सर्वच उमेदवारांचे समर्थक आळस झटकून जोमाने कामाला लागले आहेत. त्यात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी "सर्व" प्रयोग मुक्तपणे सुरू आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.