Malegaon News : गेल्या ३७ वर्षांपासून मालेगाव जिल्हा निर्मितीचे घोंगडे भिजत आहे. मालेगाव महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा जिल्हा निर्मितीच्या चर्चांना उधाण आलं आहे. मालेगाव नेमका जिल्हा कधी होणार हा प्रश्न विचारला जावू लागला आहे.
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात अपडेट दिली आहे. मालेगाव जिल्हा निर्मिती बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व महसूल मंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केल्याची माहिती भुसेंनी दिली आहे.
मालेगाव येथे रविवारी नदी जोड प्रकल्पासह विविध विकास कामांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दादा भुसे यांनी राज्यातील इतर जिल्ह्यांचे विभाजन सुरु होताच मालेगाव जिल्ह्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याची ग्वाही दिली.
"मालेगाव जिल्हा निर्मितीची मागणी माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या कार्यकाळापासून आहे. अंतुले यांच्या कार्यकाळातच जिल्हानिर्मितीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, त्याला आता ३७ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. विविध कारणांमुळे जिल्हा विभाजनाची प्रक्रिया वारंवार लांबणीवर पडली आहे. नाशिक जिल्ह्यातून बाहेर पडण्यात यातील काही तालुक्यांचा विरोध आहे. त्यामुळे अंतिम निर्णय रखडला आहे. त्यातच आता भुसे यांनी याबाबत पुन्हा एकदा आश्वासन दिलं आहे.
ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दादा भुसे यांनी मालेगावकरांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. निवडणुका आल्या की मालेगाव जिल्हा निर्मितीचा मुद्दा उकरुन काढला जातो. नेहमीप्रमाणे जिल्हा निर्मितीचं आश्वासन दिलं जातं. गेल्या ३७ वर्षांमध्ये सत्तेवर येणाऱ्या प्रत्येक सरकारने या मागणीच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर तयारी सुरु असल्याची आश्वासने आजवर दिली. परंतु प्रत्यक्षात काहीही हाचलाची झालेल्या नाहीत.
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे ९० टक्के काम पूर्ण
उत्तर महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेताना मंत्री दादा भुसे यांनी प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाईल, असा विश्वास व्यक्त केला. बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती सादर करण्यात आली असून, सर्वेक्षण व अन्वेषणाच्या कामातील सुमारे ९० टक्के टप्पा पूर्ण झाल्याची माहिती दिली. या प्रकल्पाअंतर्गत पश्चिमवाहिनी नदीखोऱ्यातून १०.६४ टीएमसी पाणी गिरणा खोऱ्याकडे वळवले जाणार आहे. परिणामी सुरगाणा, कसमादे, चाळीसगाव, भडगाव, एरंडोल आदी तालुक्यांतील सुमारे १.२ लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.