Dada Bhuse Inspects Closed NMC Schools in Nashik  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse Nashik : अभिजित दिपके पाहणी करण्याआधीच दादा भुसे पोहोचले ; नाशिकच्या बंद शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय

Dada Bhuse Inspects Closed NMC Schools in Nashik : अभिजित दीपके हे नाशिकमधील महापालिकेच्या शाळांची पाहणी करण्याच्या तयारीत आहे. त्यांनी तसा इशारा दिला असताना शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे अॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे.

Ganesh Sonawane

Dada Bhuse Inspects Closed NMC Schools in Nashik : कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके हे नाशिक महापालिकेच्या शाळांची पाहणी करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे अर्ज केला असताना आता शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे अॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. मंत्री भुसे यांनी रविवारी (दि. ४) सुटीचा दिवस असतानाही घाईघाईत महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळांची पाहणी केली.

नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील बंद असलेल्या शाळांची आवश्यक दुरुस्ती व पायाभूत सुविधा उपलब्ध करुन त्या पुन्हा सुरु केल्या जातील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ व सुविधायुक्त शैक्षणिक वातावरण निर्माण करून विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश मंत्री दादा भुसे यांनी दिले.

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी रविवारी नाशिक शहरातील पंचवटी येथील मनपा प्राथमिक शाळा क्र. ३०, सिडको येथील मनपा माध्यमिक शाळा तसेच जेलरोड येथील मनपा शाळा क्र. ५६ येथे भेट देऊन शाळांची पाहणी केली. यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, अजय बोरस्ते, प्रविण तिदमे यांच्यासह महानगरपालिका प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सध्य स्थितीचा आढावा

मंत्री भुसे यांनी शाळांमधील उपलब्ध शैक्षणिक सुविधा, वर्गखोल्या, इमारतींची सद्यस्थिती, पायाभूत सुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्थितीचा आढावा घेतला. महानगरपालिका हद्दीतील सध्या बंद असलेल्या सर्व शाळांची सद्यस्थिती तपासून त्यांचे योग्य पद्धतीने वर्गीकरण करावे. ज्या शाळांच्या इमारती अथवा परिसरात दुरुस्तीची आवश्यकता आहे, तेथील कामे प्राधान्याने व तातडीने पूर्ण करावीत. शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता, वर्गखोल्या तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मंत्री भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी कृती आराखडा

मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच शाळांच्या इमारती व परिसर विद्यार्थ्यांना आकर्षित करतील, यासाठी आवश्यक सुधारणा करणे गरजेचे आहे. शाळांमध्ये सकारात्मक व आनंददायी वातावरण निर्माण झाल्यास पालकांचा मनपा शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होण्यास मदत होईल. त्यामुळे बंद शाळा पुन्हा सुरू करण्यासोबतच तेथील विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही मंत्री भुसे यांनी सांगितले.

शाळांच्या पाहणीदरम्यान उपलब्ध शैक्षणिक साधने, विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा तसेच आवश्यक असलेल्या सुधारणा याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. ज्या ठिकाणी आवश्यक कामे प्रलंबित आहेत, ती कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही मंत्री भुसेंनी दिल्या.

‘सीएसआर’ निधीसाठी प्रयत्न

शाळा पुन्हा सुरु करताना दुरुस्‍तीसाठी सीएसआर निधीचा वापर करण्यासह काही कंपन्‍या दत्तक घेऊ इच्‍छित असतील, त्‍यांच्‍यावर शाळेची जबाबदारी दिली जाईल. आठवड्याभराच्या आत नाशिकच्या शाळांचा अहवाल महापौर यांच्यासमोर येईल. पालकांचा कल लक्षात घेता सेमी-इंग्रजी वर्ग सुरु करण्याचा देखील विचार असल्याचे भुसे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT