Hemant Soren & Devendra Fadanvis Saarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Women's Politics : झारखंड आणि महाराष्ट्राच्या निकालात काय आहे साम्य? 'या'मुळे जिंकले फडणवीस अन् सोरेन!

Similarities in Jharkhand and Maharashtra election results 2024: महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या मात्र झारखंड मध्ये भाजपला फटका बसला.

Sampat Devgire

Mumbai News: महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या. मतमोजणीचा निकाल देखील एकाच दिवशी झाला. मात्र महाराष्ट्रात यश मिळवलेल्या भाजपला "सर्व काही" करूनही झारखंडमध्ये मोठा फटका बसला.

झारखंड मध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी एक हाती निवडणूक जिंकली. ‘सर्व प्रयोग’ आणि ताकदीनिशी उतरलेल्या भाजपला सोरेन यांनी झटका दिला. महाराष्ट्र आणि झारखंड या निवडणुकीमध्ये एक लक्षणीय साम्य असल्याचे पुढे आले आहे.

झारखंड मध्ये निवडणुकीच्या चार महिने आधी "मैया सन्मान योजना" राबविण्यात आली. यामध्ये अठरा वर्षांवरील ५० लाख महिलांना दरमहा एक हजार रुपयांचे आर्थिक मदत करण्यात येत होते. या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

योजनेतील मानधन एक हजार ऐवजी अडीच हजार करण्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी निवडणुकीत आश्वासन दिले होते. राज्यात सरकार आल्यावर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी अडीच हजार रुपये दरमहा महिलांना देण्याचा निर्णय घेतला. ही योजना महाराष्ट्रात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेसारखीच होती.

लाडकी बहिण योजनेत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात होते. त्यात वाढ करून दोन हजार शंभर रुपये करण्याची घोषणा भाजपने केली होती. महाविकास आघाडीने या योजनेत तीन हजार रुपये महिलांना देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र महायुती सरकारने विरोधकांचे सरकार आल्यास महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे पंधराशे रुपये बंद होतील, अशी हाकाटी पिटली.

त्यावर महिलांचा विश्वास बसला. अशीच स्थिती झारखंडमध्ये झाली. मुख्यमंत्री सोरेन यांनी भाजपचे सरकार आल्यास मैया सन्मान योजना बंद करण्यात येईल, अशी भीती प्रचारातून व्यक्त केली. महिलांना त्यावर विश्वास बसला आणि सोरेन यांचे सरकार पुन्हा सत्तेत आले.

या निवडणुकीत झारखंडमध्ये ८१ पैकी ५६ जागांवर इंडिया आघाडी यशस्वी झाली. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाला ३४ जागा मिळाल्या. काँग्रेसला १६ तर राष्ट्रीय जनता दलाला चार जागांवर यश आले. भारतीय जनता पक्ष अवघ्या २१ जागा मिळवू शकला. विशेष म्हणजे भाजपने या निवडणुकीत आपली केंद्रातील सत्ता आणि लगतच्या राज्यांतील सर्व रसद ओतली होती.

झारखंड मुक्ती मोर्चाचे चंपई सोरेन या माजी मुख्यमंत्र्यांना निवडणुकीच्या तोंडावरच भाजपामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र एवढे सगळे करूनही भाजप यशस्वी होऊ शकला नाही. महाराष्ट्र आणि झारखंड येथील निवडणुकांतील साम्य म्हणजे दोन्हीकडे महिलांना दरमहा रोख रक्कम देणारी योजना जवळपास एकाच वेळी सुरू करण्यात आली होती. त्या योजनेला महिला मतदारांनी भरपूर होऊन प्रतिसाद दिला असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचे सरकार आले. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात भाजप प्रणित महायुतीला भरघोस यश मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT