एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. एकीकडे त्यांनी आपल्या सीएम पदाचा राजीनामा दिला असून काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पदभार स्विकारला आहे. पण यानंतर आता शिंदेंनी महायुती सरकारच्या मुख्यमंत्री पदासाठी आपल्याला समर्थन द्या यासाठी थेट मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसला विनंती केल्याची माहिती समोर येत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी उशीरा मुंबईत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज अमित शहा आज आले नाही तर थेट दोन दिवसानंतर येतील, अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून माहिती दिली गेली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि काही आमदार अलर्टवर आहेत. मागच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजपचे आमदार, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी असलेले आमदार मुंबईमध्ये थांबलेले आहेत. अचानक मीटिंग बोलावली तर पळापळ नको म्हणून भाजपचे आमदार आज संध्याकाळी अलर्टवर असणार आहेत.
"इनोवा गाडीत बसतात तेवढेच पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले आहेत, शरद पवार आता एवढे मोठे राहिले नाहीत"; अशा शब्दात भाजप गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. तसंच रोहित पवार कमी फरकाने निवडून आले म्हणजे त्यांचा पराभव झाला आहे. सर्व ओबीसी समाज देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी उभा राहिला आणि शरद पवारांनी केलेला जातीयवाद गेल्या दोन वर्षात पाहायला मिळाल्याचंही पडळकर यावेळी म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी अजितदादांचं तोंडभरून कौतुक केलं. ते म्हणाले, "मी कधीच अजित पवारांचा कौतुक करत नाही. पण देवेंद्र फडणवीसांना अजितदादांनी जो पाठिंबा दिला आहे त्यामुळे मी त्यांचे कौतुक करतो."
शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी EVM बाबतचा संशय दूर करायचा असेल तर केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे, अशी मागणी केली आहे.
माजी आमदार नरसय्या आडम यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव झाल्यानंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. मात्र शेवटच्या श्वासापर्यंत कामगारांसाठी लाल झेंड्याच्याखाली सामाजिक आणि चळवळीत काम करत राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधिमंडळातील माकपचा चेहरा म्हणून नरसय्या आडम यांची ओळख आहे.
एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिंदेंनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. केसरकर म्हणाले, "एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. नवीन सरकार अस्तित्वात येण्याआधी ती औपचारिकता असते. तर आजपासून ते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. तर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची भावना असते की, आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. मात्र, जो निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह घेतील तो मान्य असेल."
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्यासाठी राजभवनावर ते दाखल झाले आहेत. CM शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील राजभवनावर दाखल झाले असून त्यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 14 व्या विधानसभेची मुदत आज 26 तारखेला संपत असल्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे हे नवीन सरकार स्थापन होईपर्यंत राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत.
राज्यात मुख्यमंत्रिपदावरुन हालचाली सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर शिवसेनेचे माजी खासदारही दिल्लीत उपस्थित राहणार असून 7 विद्यमान आणि 4 माजी खासदार पंतप्रधानांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
बदलापूर रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रूळ तात्पुरता दुरुस्त करण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मोताळातालुकाध्यक्षावर प्राणघातक हल्ला झाला आहे. ही धक्कादायक घटना काल सायंकाळी घडली आहे. बुलढाण्यातील तालखेड फाट्या जवळ चार जणांनी हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात सुनील कोल्हेंना गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. तर त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून पुढील उपचार सुरू आहेत.
राज्याचा आगामी मुख्यमंत्री कोण असणार याबाबच्या चर्चा सुरू असतानाच आता नागपूरमधील एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख असणारी पाटी काढण्यात आली आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. तर ही पाटी मेंटेनन्ससाठी काढल्याची माहिती आता समोर आली असून पुन्हा ती पाटी आहे त्या जागेवर लावण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभेचा कार्यकाळ संपणार असल्याने ते आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. तर नवीन मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत. तसंच दोन्ही मुख्यमंत्री देखील आज राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.
राज्यात नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. तसंच राज्याचा आगामी मुख्यमंत्री कोण असणार याबाबतचा निर्णय घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.
रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय कुमार वर्मा यांच्याकडून रश्मी शुक्ला पदभार स्वीकारणार आहेत. त्या आज पोलिस महासंचालकपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.