Devendra Fadnavis Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis : समोर क्रिकेटचं मैदान बसेल इतकं अंतर ; नाशिकच्या कार्यक्रमात CM फडणवीस आपल्याच पोलिसांवर नाराज... केल्या कडक सूचना

CM Devendra Fadnavis Expresses Displeasure with Police : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथील कार्यक्रमात आपल्याच गृह खात्यातील पोलिस विभागावर नाराजी व्यक्त केली. त्यांना कडक सूचना दिल्या.

Ganesh Sonawane

Devendra Fadnavis Nashik visit : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिक दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते पंचायतराज अभियान २.० चे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्याच गृहखात्यातील पोलिसांवर नाराजी व्यक्त करत त्यांना सूचना केल्या. त्यामुळे उपस्थित सर्वांनाच आश्चर्य वाटले, त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनीच त्याचे कारण स्पष्ट केले.

गेल्यावर्षी अभियानात सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थांचे फडणवीसांनी अभिनंदन केलं. पुरस्कार मिळालेल्या किमान पाच ग्रामपंचायतींना भेट देणार असल्याचं सांगितलं. त्याचवेळी बोलता बोलता फडणवीसांनी वेगळा विषय काढत आपला मोर्चा पोलिसांकडे वळवला.

फडणवीस म्हणाले, "भाषण करत असताना एक तक्रारही मला करायची आहे. ही तक्रार या अभियानाशी संबधित नाही. पण, पोलिस विभागाला मला तक्रार करायची आहे. सुरक्षेचे कारण असेल, परंतु आपल्यात आणि समोर बसलेल्या उपस्थितांमध्ये एक क्रिकेटचे मैदान बसेल इतके अंतर ठेवण्यात आले आहे. इतकं दूर सगळ्या लोकांना बसवलं आहे, की त्यांच्या नजरेत नजर घालून मला त्याचं अभिनंदन करता येत नाही अशी खंत फडणवीसांनी व्यक्त केली.

यापुढे पोलिसांनी इतके अंतर राहणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवावी अशी जाहीर सूचना भर कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. तुम्हाला देखील सुरक्षेचे काही नियम पाळावे लागतात. पंरतु लोक मोठी मेहनत करुन इथपर्यंत येतात. ते आमचे लोक आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना आमच्यापासून इतके दूर बसवू नका, त्यांना आमच्या जवळ बसण्याची संधी यापुढे प्रत्येक कार्यक्रमात द्यावी अशा सूचना त्यांनी पोलिस विभागाला केल्या.

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या समयसूचकतेचे उपस्थितांना आश्चर्य वाटले. कार्यक्रमात याविषयावर चांगलीच चर्चा रंगली. राज्यभरातून सकाळी दहा वाजेपासून कार्यक्रमाला आलेली गावागावातील सरपंच, ग्रामस्थ कार्यक्रमाला उशीर होत असल्याने कंटाळली होती. परंतु, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात उपस्थितांविषयी केलेल्या उल्लेखाने त्यांचा कंटाळा काहीसा दूर झाला.

नाशिकच्या यूथ फेस्टिव्हल मैदानावर आयोजित या कार्यक्रमास विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि राज्यभरातील सरपंच उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT