

Nashik Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये कोट्यावधी भाविक दाखल होती. अशावेळी गर्दीचे व्यवस्थापन आणि आपत्तींचा धोका लक्षात घेऊन राज्य शासनाने नाशिकसह राज्यातील १० प्रमुख महापालिकांमध्ये स्वतंत्र शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्या दरम्यान पूर, आग, चेंगराचेंगरी यांसारख्या आपत्तींचा सामना करण्यासह महापालिका, पोलिस, आरोग्य व अग्निशामक यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी या प्राधिकरणावर असणार आहे. नाशिककरांच्या तसेच आलेल्या भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्राधिकरणाची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ४१-अ अंतर्गत ही रचना करण्यात आली असून, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव विनिता वेद सिंगल यांनी याबाबतची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने घेतलेला हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाला आहे.
या दहा महापालिकांचा समावेश
नाशिक महापालिकेसह, बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नवी मुंबई, पिंप्री-चिंचवड, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार या महापालिकांमध्ये पहिल्या टप्प्यात प्राधिकरण स्थापन होणार आहे. दाट लोकवस्ती आणि आपत्तींच्या संभाव्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्राधिकरणाची रचना
संबंधित महापालिकेचे आयुक्त हे प्राधिकरणाचे अध्यक्ष असतील तर जिल्हाधिकारी उपाध्यक्ष असतील. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किंवा आपत्ती व्यवस्थापनाचे उपायुक्त सदस्य-सचिव म्हणून काम पाहतील. पोलिस, प्रादेशिक विकास प्राधिकरण, अग्निशामक, विद्युत, पाणीपुरवठा व स्वच्छता, आरोग्य आणि माहिती व जनसंपर्क विभागांचे प्रमुख सदस्य असतील. अशा एकूण दहा सदस्यांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा कार्यरत राहणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये कोट्यावधी साधू-महंत आणि भाविक दाखल होण्याचा अंदाज आहे. या प्रचंड गर्दीचे नियोजन करताना संभाव्य आपत्तींचा वेळीच मुकाबला करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे.
शहरांमध्ये वाढते नागरीकरण आणि लोकसंख्येची घनता लक्षात घेता पूर, आग, इमारत कोसळणे, साथीचे रोग, गॅसगळती, रासायनिक दुर्घटना, वाहतूक कोंडी आणि चेंगराचेंगरी अशा नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचे प्रतिबंधात्मक नियोजन, पूर्वतयारी आणि तातडीचा प्रतिसाद ही प्राधिकरणाची प्रमुख कामे असतील. आपत्तीच्या काळात विविध विभागांतील समन्वयाचा अभाव दूर करून परिस्थितीला तोड देण्यासाठी मदतकार्य अधिक वेगाने राबविण्यावर भर दिला जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.