Yashwant Senas hunger strike  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhangar Community : यशवंत सेनेचे उपोषण थांबवण्यात राम शिंदे अपयशी; सरकारकडून समिती स्थापन, मात्र...

Yashwant Sena Chaundi : जाणून घ्या, यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी काय भूमिका घेतली आहे.

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश व्हावा, या मागणीसाठी उपोषण-आंदोलनांनी जोर धरलेला असताना सरकार आता धनगर समाजाच्या मागणीबाबत अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे. शासनाने धनगर समाजाच्या एसटी समावेशासाठी नऊ सदस्यांची समिती स्थापन केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारच्या या आदेशाची प्रत सोमवारी माजी मंत्री आणि भाजप आमदार राम शिंदे यांनी चौंडी इथे बेमुदत उपोषणाला बसलेल्या यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दर्शवत उपोषण आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, यामध्ये त्यांना काही यश आले नाही.

कारण यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी ''केवळ समिती स्थापून चालणार नाही, तर समिती किती कार्यकाळात अहवाल देईल, याबाबत शासनाने आपली भूमिका अगोदर स्पष्ट करावी. त्यानंतर यशवंत सेनेची कोअर कमिटीची बैठक घेऊन आंदोलनाबाबत निर्णय घेतला जाईल,'' असे सांगत आंदोलन मागे घेण्यास नकार दिला.

या वेळी यशवंत सेनेचे उपोषणकर्ते यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेश सरचिटणीस सुरेश बंडगर, प्रदेशाध्यक्ष प्रा. माणिकराव दांगडे पाटील, प्रदेश सचिव नितीन धायगुडे, प्रदेश मीडियाप्रमुख स्वप्नील मेमाणे, समाधान पाटील, किरण धालपे आदी उपस्थित होते.

चौंडीमध्ये गेल्या चार दिवसांपासून यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते बेमुदत उपोषण करत आहेत. यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही यशवंत सेनेने चौंडीत तब्बल 21 दिवस उपोषण आंदोलन केले होते. त्यावेळी शासनाच्या वतीने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी चौंडीत येत 50 दिवसांत धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेशासंदर्भात निर्णय केला जाईल, असे लेखी आश्वासन दिले होते.

या नंतर धनगर समाजाच्या नेत्यांसोबत दोन बैठका सरकारने घेत इतर राज्यात धनगर समाजाला ज्या तरतुदींच्या आधारे आरक्षण दिले, त्याचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे सांगितले होते. मात्र, 50 दिवसांत सरकारने अशी कुठलीही समिती स्थापन केली नाही, तसेच दिलेले आश्वासन पाळले नसल्याने यशवंत सेना पुन्हा आक्रमक झाली असून, चौंडीत पुन्हा आंदोलन सुरू केले आहे.

या पार्श्वभूमीवर आता सरकारच्या धनगर समाजाच्या मागणीबाबत हालचाली वाढल्याचे दिसत आहे. याशिवाय आज सरकारने मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यांची समिती स्थापित केली असून, या समितीत 5 शासकीय, तर 4 अशासकीय सदस्य असतील.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT