Ahmednagar News : धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण लागू व्हावे, यासाठी येत्या बुधवारपासून (18 सप्टेंबर) सात जण नेवासा फाटा इथं उपोषणाला बसणार आहोत. त्यानंतर आठ दिवसात सरकारने निर्णय न घेतल्यास सातही जण गोदावरी नदीत उड्या टाकून सामुदायिक जलसमाधी घेऊ, असा इशारा सकल धनगर जमातने दिला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मुंबईत धनगर समाज आरक्षणाबाबत गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई आणि अन्य उपस्थित घेतलेली बैठक मान्य नाही.
सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने या बैठकीस जायलाच नको होते. या शिष्टमंडळाला समाजाची मान्यताच नसल्याचा दावा महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीने केला.
धनगर समाजाला भटके विमुक्त (एनटी) मध्ये साडेतीन टक्के आरक्षण असून एवढेच आरक्षण अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. 2014 मध्ये भाजपने (BJP) सत्तेवर येताच पहिल्या कॅबिनेटमध्ये हे आरक्षण देऊ, अशी ग्वाही दिली होती.
मात्र, दहा वर्षात त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे सकल धनगर जमातचे म्हणणे आहे. त्यामुळे या मागणीसाठी आणि धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण प्रमाणपत्र मिळण्यासाठी येत्या बुधवारपासून (18 सप्टेंबर) नेवासा फाटा इथं संभाजीनगर महामार्गावर उपोषण आंदोलन केले जाणार आहे.
यात महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण (Reservation) कृती समितीचे जिल्हाध्यक्ष व भाजपचे उत्तर जिल्हा चिटणीस अशोक कोळेकर यांच्यासह प्रल्हाद सोरमारे, बाळासाहेब कोळसे, राजू मामा तागड, देवीलाल मंडलिक, रामराव कोल्हे व भगवान भोजने सहभागी होणार आहेत.
उपोषणास बसल्यानंतर आठ दिवसात सरकारने एसटी आरक्षण निर्णय घेतला नाही आणि प्रमाणपत्र वाटप सुरू केले नाही, तर हे सातही जण गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन जलसमाधी घेणार असल्याचे कोळेकर, तागड आणि सोरमारे यांनी सांगितले.
या सात जणांपैकी राजू तागड यांनी मागील वर्षी 17 सप्टेंबरला मिरी (ता. पाथर्डी) येथील वीरभद्र मंदिरात याच मागणीसाठी 13 दिवस उपोषण केले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संपर्क साधून 50 दिवसांत मार्ग काढू, असं आश्वासन दिले होते. मात्र, वर्ष झाले तरी निर्णय झालेला नाही, असा उद्वेग राजू तागड यांनी व्यक्त केला.
प्रल्हाद सोरमारे म्हणाले, "मागील महिन्यात पुण्यात झालेल्या बैठकीत संभाजीनगर किंवा राहुरी इथं आंदोलन करण्याचा निर्णय झाला. मात्र काही जणांनी अचानक पंढरपूरला उपोषण सुरू केले. आताही रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाची बैठक घेऊन धनगर आरक्षणाचा विषय कायद्याच्या चौकटीत बसवू, असे आश्वासन दिले".
मात्र मागील 10 वर्षापासून आम्ही हेच शब्द ऐकतोय. महाराष्ट्रात धनगर समाज दोन नंबरचा मोठा समाज आहे व आरक्षणाच्या आशेने त्याने भाजपला एकगठ्ठा मतदान केले आहे. मात्र आरक्षणाचा निर्णय अजूनही झालेला नाही. त्यामुळे आता धनगरी हिसका दाखवला जाणार आहे व 18 सप्टेंबरपासून उपोषण आणि सामुदायिक जलसमाधी आंदोलन केले जाणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.