Ahmednagar News : शिर्डीतील महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या महाअधिवेशन गाजले ते उद्धव ठाकरे यांच्या 'ठाकरी' भाषणानं. महायुती सरकारवर चौफेर टीका करताना, त्यांनी कोणतीच कसर ठेवली नाही. भाषणावेळी काहीसा तांत्रिक अडथळा येताच, तो ठाकरेंनी तो जाणवून देखील दिला नाही.
उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची 'एन्ट्री' झाली. उद्धव ठाकरेंनी यावेळी केलेली मश्किल टिप्पणी, नानांनी तत्परतेने घातलेली गांधी टोपी, हा चर्चेचा विषय ठरला.
शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डीतील पेन्शन राज्य महाअधिवेशनात 'ठाकरी' शैलीत केलेलं भाषण चर्चेत आलं आहे. राज्य सरकारच्या इतर योजनांवर सुरू असलेल्या खर्चांवरून निशाणा साधताना, ही योजना का लागू होऊ शकत नाही, असा सवाल उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणातून केला. सरकार बदलण्याची ताकद तुमच्यात असल्याचं सांगत, सरकार बदला, मी तुम्हाला जुनी पेन्शन जशीच्या तशी देतो, असं वचन उद्धव ठाकरेंनी दिलं. या महाअधिवेशनात उद्धव ठाकरेंचे भाषण बहरात आलं असतानाच, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची एन्ट्री झाली.
नाना पटोलेंनी एन्ट्री घेताच, उद्धव ठाकरेंना हात जोडून नमस्कार घातला. नाना पटोले (Nana Patole) खुर्ची जात असतानाच, उद्धव ठाकरेंनी भर भाषणात त्यांना हाक मारली, त्यांचा हात हातात घेत, दोघांनी हात उंच करत अभिवादन केलं. उद्धव ठाकरे यांनी 'पुढचा बॅड्समन आलेला आहे. नाना, मी बहुतेक फोर आणि सिक्स मारले असावेत, बाकी काही राहीलं असेल, तर तुम्ही ठोकून काढा', असं म्हणताच अधिवेशनात जोरदार घोषणाबाजी झाली. याच दरम्यान, नाना पटोलेंनी 'एकच मिशन, जुनी पेन्शन' लिहिलेली गांधी टोपी डोक्यावर चढवली. यावर ठाकरेंनी, 'बघा आम्ही आमच्या टोप्या घालून घेतो. पण लोकांना टोप्या घालत नाही. ते काम मिंधे सरकार करतं', अशी टिप्पणी केली. उद्धव ठाकरेंच्या या टिप्पणीवर सभागृहात जोरदार हशा झाला.
उद्धव ठाकरे म्हणाले, "दीड वर्षापूर्वी नागपूरमध्ये आला होतात. त्यावेळी मला आंदोलनाची कल्पना आली. मोठा मोर्चा झाला. हे सर्व होत असतानाच, तुमच्यातील एक घटक तिकडं सटकला आणि तुमच्या आंदोलनावर पाणी ओतलं. हे होणार आहे. फाटाफुटीची, फोडाफोडीचं राजकारण तुमच्याबरोबर होणार आहे, शिवसेनेसोबत झालं, ते तुमच्यासोबत होणार आहे. एकजूट झाल्यानंतर सरकार गेल्यात जमा आहे. त्यामुळे यांना पेन्शन देण्यापेक्षा टेन्शन द्या". बेमुदत उपोषणाची करू नका. आपलं आंदोलन, असं पाहिजे की, यांना सत्तेशिवाय उपाशी ठेवलं पाहिजे. तो निर्धार करा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.
"आंदोलन पेटल्यानंतर, ती मशाल आहे. कोणी सरकारचे चमचे असतील, तर त्यांना पाणी ओतायला देऊ नका. मी तुम्हाला शब्द देतो, तुमची योजना अंमलात आणल्याशिवाय गप्प राहाणार नाही. जुनी पेन्शनची मागणी करताय, तसं मला तुमच्याकडून एक वचन हवं आहे. कारण माझा शब्द आणि तुमची ताकद मिंधे टीव्हीवरून बघत आहेत. निवडणूक येईपर्यंत ज्यांना बहीण आहे, ते माहीत नव्हतं, त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. आज किंवा उद्याच्या कॅबिनेटमध्ये सरकार तुमची जुनी पेन्शन योजना मान्य करतील. त्यावेळी तुम्ही काय करणार? तुम्ही देणार त्यांना मत, कारण अशा गोष्टी होतात. दोन महिने आहेत, आपलं सरकार आणा, मी तुमची मागणी मान्य करतो, असं वचन दिलं. हे वचनं देताच, सरकारला घाम फुटणार आहे", असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.