Ahmednagar News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी सरकारला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली, तर सरकारकडून धनगर समाजाला 50 दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत आता संपली.
तरीही सरकारने अद्याप आरक्षणाबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याने धनगर समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. धनगर समाजाने अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश व्हावा, यासाठी मध्यंतरी स्थगित केलेले आंदोलन पुन्हा एकदा सरकारने आश्वासन न पाळल्याने शुक्रवारपासून सुरू केले आहे.
नगर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडीतून हे उपोषण आंदोलन सुरू होत आहे. सरकारने 50 दिवसात हा प्रश्न सोडवू, असे दिलेले लेखी आश्वासन पाळले नाही आणि त्यामुळे यावेळेस आता जोपर्यंत सरकार अनुसूचित जमातीमध्ये समावेशाचा अध्यादेश काढत नाही, तोपर्यंत उपोषण आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार यशवंत सेनेच्यावतीने जाहीर करण्यात आला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा, या मागणीसाठी यशवंत सेनेने 6 सप्टेंबरपासून चौंडीमध्ये बेमुदत उपोषण सुरू केले होते. हे आंदोलन 17 दिवस सुरू राहिले. दरम्यान, राज्य सरकारच्या वतीने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी मध्यस्थी करत सरकार समाजाच्या आरक्षणाबाबत 50 दिवसांत मागणीबाबत ठोस निर्णय घेईल, असे लेखी आश्वासन दिले होते.
मात्र, 50 दिवस उलटून गेल्यानंतरही सरकारने कोणतेही आश्वासन न पाळल्याने पुन्हा एकदा धनगर समाज आक्रमक झाला असून, यशवंत सेनेच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा चौंडीमध्ये बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले असल्याची माहिती यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी दिली.
सरकार वारंवार लेखी आश्वासन देते, वेगवेगळ्या कमिट्या नेमल्या जातात. मात्र, सरकारने या कमिट्या नेमल्यानंतरही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे धनगर समाजामध्ये संतप्त भावना असून चौंडीसह राज्यामध्ये बारामती, लोणंद, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर या ठिकाणी समाजाचे युवक उपोषण आंदोलन करत आहेत.
राज्यभर धनगर समाज आक्रमक झाला असून, धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या वेळी आंदोलन अधिकाधिक तीव्र केले जाईल, असं यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले. उपोषणाला दोडतले यांच्यासह अण्णासाहेब रुपनवर, बणगर आदी बसले आहेत.
Edited by Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.