Dhanur Chhatrapati Shivaji Maharaj Statue Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

विनापरवानगी पुतळ्याचे समर्थन भोवले, जिल्हाधिकाऱ्यांकडून धनूरचे सरपंच अपात्र!

प्रशासनाने ग्रामसेवक व पोलिस पाटलाच्या निलंबनाचा आदेश काढले.

Sampat Devgire

धुळे : धनूर (ता. धुळे) (Dhule) येथे ग्रामपंचायत कार्यालयालगत विनापरवानगी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा दोन दिवसांत हटविण्याचा अल्टिमेटम जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma) यांनी दिला. या वादासकारणीभूत सरपंचांवर अपात्रतेची कारवाई करावी, तसेच ग्रामसेवक व पोलिस पाटलाला निलंबित करण्याचा आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

धनूर येथे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मंजुरी न घेता पुतळा उभारण्यात आला. ग्रामपंचायतीलगत रातोरात हा पुतळा उभारला. त्यासाठी क्राँक्रीटचे फाउंडेशन पूर्वीच तयार होते. असे अनधिकृत बांधकाम ग्रामपंचायतीने का खपवून घेतले. या प्रकरणी कायदेशीर कारवाई का केली गेली नाही, असे प्रश्‍न उपस्थित करत महसूल प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा आदर केला जावा, अशी भूमिका घेतली आहे. त्यानुसार सरपंच सत्यभामाबाई शिंदे यांना अपात्र ठरविण्याचा, तर ग्रामसेविका सुरेखा ढोले व पोलिस पाटील संदेश पाटील यांना निलंबित करण्याचा आदेश जिल्हा परिषद प्रशासनास दिला आहे.

महसूल यंत्रणेकडून नोटीस

पुतळा काढताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अन्यथा, कारवाईच्या इशाऱ्याची नोटीस धनूरच्या सरपंच शिंदे, ग्रामसेविका ढोले यांना सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बजावली आहे. त्यामुळे घडामोडींकडे जिल्ह्याचे लक्ष असेल. धनूर येथे शुक्रवारी मध्‍यरात्रीनंतर ग्रामपंचायतीलगत अश्‍वारूढ छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा अज्ञातांनी उभारला. तो विनापरवानगी असल्‍यामुळे महसूल, पोलिस प्रशासन व ग्रामस्‍थांमध्‍ये तीन दिवसांपासून चर्चा सुरू होती.

बैठक आणि जमावबंदी

असे असताना पोलिस प्रशासनाने धनूर येथे जमावबंदीचा आदेश जारी केला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्हाधिकारी शर्मा यांची खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार कुणाल पाटील यांनी भेट घेतली.

सरपंच सत्यभामाबाई शिंदे, उपसरपंच माधुरी पाटील व तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. अधिकारी व लोकप्रतिनिधींमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील यांनी सांगितले. त्यात प्रांताधिकारी धोडमिसे यांनी सायंकाळी पुतळा काढून घेण्याबाबत ग्रामपंचायतीला नोटीस बजावली.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT