Dr. Shobha Bacchav Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhule Constituency 2024: मविआच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या बैठकीला काँग्रेसच्या नेत्यांचीच दांडी !

Political News: महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचार बैठकीला मालेगावात प्रमुख नेते गायब आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना धुळे मतदारसंघातील प्रचारात अद्याप सूर गवसलेला दिसत नाही.

Sampat Devgire

Dhule News: धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या उमेदवारीला स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना प्रचारात अद्याप सूर गवसलेला नाही. गेल्या आठ दिवसांपासून डॉ. बच्छाव धुळे मतदारसंघातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराचे नियोजन करीत आहे.

या संदर्भात धुळे येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत काँग्रेस (Congress) नेते आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांना प्रचाराची सूत्रे देण्यात आली होती. धुळे येथील बैठकीला महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे काँग्रेसच्या प्रचाराला सूर गवसला अशी चर्चा होती. मात्र, मंगळवारी मालेगाव येथे झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच हा दावा खोटा ठरवला आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षासाठी मालेगाव शहर आणि मालेगाव बाह्य हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचे आहेत. आजवर झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये लोकसभेसाठी काँग्रेसला मालेगाव शहरातून मोठे मताधिक्य मिळत आले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या प्रचाराच्या नियोजनाच्या बैठकीत मात्र नेत्यांनी पाठ फिरवली. महत्त्वाचे कार्यकर्तेदेखील या बैठकीला नव्हते. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना धक्का बसला आहे. त्यावर काय उपाययोजना करावी यावर सध्या पक्षाचे पदाधिकारी आणि उमेदवार डॉ. बच्छाव चर्चा करीत आहेत.

मालेगाव शहराचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आसिफ शेख बैठकीस अनुपस्थित होते, त्यांचे प्रतिनिधी म्हणून काही कार्यकर्ते आले होते. मात्र, शहराच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती सगळ्यांनाच खटकली. यामध्ये समाजवादी पक्षाचे नेते मुस्ताक दिग्निटी, अद्वय हिरे, काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे हे प्रमुख आहेत. माजी आमदार असिफ शेख यांच्याकडे शहराच्या प्रचाराची सूत्रे असतात. त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे या बैठकीत मालेगाव शहरातील प्रचाराचे नियोजन करता आले नाही.

मालेगाव शहरात यापूर्वीदेखील डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या पक्षाच्या कार्यालयात गेल्या होत्या. तेव्हा त्यांना मोठा विरोध झाला होता. त्यामुळे कालची बैठक शहरातील महाराणी लॉन्स येथे ठेवण्यात आली होती. या बैठकीला जिल्हा अध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल, काँग्रेसचे नेते प्रसाद हिरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजेंद्र भोसले, नाशिकचे शहराध्यक्ष आकाश छाजेड आदी प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होते.

नेत्यांच्या मनधरणीसाठी घ्यावे लागणार परिश्रम

मालेगाव शहरातील नेत्यांनीच या बैठकीकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे आता उमेदवार डॉ. बच्छाव यांना प्रचारात सहभागी न झालेल्या नेत्यांची मनधरणी करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागणार आहेत. धुळे मतदारसंघात काँग्रेसच्या प्रचारात सुसूत्रता येण्यासाठी आणखी काही कालावधी जाईल. त्याचा उमेदवार डॉ. बच्छाव यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

R

SCROLL FOR NEXT