Dhule Anil Gote Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhule Constituency 2024 : अनिल गोटे आणि काँग्रेस बंडखोरांची बैठक भाजपने उधळली !

Sampat Devgire

Anil Gote Rebel News : धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज काँग्रेस बंडखोर व अन्य नेत्यांनी तिसरा पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

राजीनामा दिलेले काँग्रेसचे धुळ्याचे जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर, भाजपचे प्रदेश सदस्य डॉ. विलास बच्छाव आणि माजी आमदार अनिल गोटे आदी नेत्यांनी धुळे (Dhule) मतदारसंघातील सर्वपक्षीय नाराज नेत्यांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यानिमित्ताने काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात धुळे मतदारसंघात तिसरी आघाडी निर्माण करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. यासाठी मंगळवारी दाभाडी मालेगाव येथे बैठक बोलविण्यात आली होती. मात्र, या वेळी तिसऱ्या पर्यायाचा विचार होण्याऐवजी वेगळ्याच कारणाने ही बैठक गाजली. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेत ही सभा उधळून लावली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. उमेश निकम यांच्या अध्यक्षतेखाली दाभाडी येथे ही परिवर्तन मंचची बैठक झाली. या वेळी उमेदवारीवरून नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी आपले मन मोकळे केले. दाभाडी येथील सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक निकम यांनी भाजपचे (BJP) डॉ. भामरे गेले दहा वर्षे खासदार आहेत. मात्र, या दहा वर्षांत मालेगावबाह्य मतदारसंघात काहीही काम झालेले नाही. कांदा निर्यातबंदी विषयावर त्यांनी संसदेत आवाज उठवला नाही. केंद्र शासनाकडेदेखील काहीही प्रयत्न केलेले नाहीत. ते अत्यंत निष्क्रीय खासदार आहेत. त्यामुळे एक सक्षम उमेदवार देण्याची आवश्यकता आहे, अशी सूचना केली. कार्यकर्त्यांनीही त्यांच्याच सुरात सूर मिसळला.

या वेळी कार्यकर्ते आपले मनोगत व्यक्त करीत असतानाच भाजपचे वैद्यकीय आघाडीचे डॉ. उमेश निकम आपल्या समर्थकांसह तेथे आले. या वेळी त्यांनी या बैठकीचे प्रयोजन काय? दाभाडी येथे बैठक का घेत आहात? केवळ भाजपचे खासदार डॉ. भामरे यांच्यावर का टीका केली जाते? कोणाच्या परवानगीने ही बैठक घेण्यात येत आहे? अशी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे आयोजक आणि भाजपचे डॉ. निकम यांच्या समर्थकांत चांगलाच वाद सुरू झाला. या वेळी घोषणा देण्यात आल्या.

काही कार्यकर्त्यांनी बैठकीचा बॅनर फाडला. या वेळी समर्थक आणि विरोधक यांच्यात धक्काबुक्कीदेखील सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला. हा गोंधळ सुरू असतानाच पोलिसही तेथे दाखल झाले. पोलिसांनी (Police) हस्तक्षेप केल्यानंतर दोन्ही गटांतील वाद निवळला. मात्र, तिसऱ्या आघाडीसाठी नाराजांनी बोलवलेली बैठक उधळल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

Edited By : Chaitanya Machale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT