Sharad Pawar News : खासदार विखेंना घरी बसवण्यासाठी शरद पवार मैदानात, विरोधकांची धाकधूक वाढली

Ahmednagar Lok Sabha Election 2024 : नगर दक्षिणची जागा जिंकायची, असं शरद पवारांचं स्वप्न आहे. या वेळी ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची संधी आहे.
nilesh lanke sharad pawar sujay vikhe patil
nilesh lanke sharad pawar sujay vikhe patilsarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) नगर दक्षिणची जागा या वेळी कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच आणि भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे ( Sujay Vikhe ) यांना घरी बसवायचेच, असे राजकीय फासे टाकत आहेत. यासाठी शरद पवार स्वतः नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सभांचा धुरळा उडवून देणार असून, सहा सभांचे नियोजन केले आहे.

नगर दक्षिणची जागा जिंकायची, असं शरद पवारांचं स्वप्न आहे. या वेळी ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची संधी आहे. शरद पवारांनी ( Sharad Pawar ) या वेळी मैदानात 'फिक्सिंग' न करणारा उमेदवार नीलेश लंकेंच्या ( Nilesh Lanke ) रूपाने उतरविला आहे. नीलेश लंकेंनीदेखील आमदारकी पणाला लावत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात नीलेश लंके नियोजनपद्धतीने लोकांपर्यंत पोहोचत असून, प्रचारात काहीशी आघाडी घेताना दिसताहेत. नीलेश लंकेंच्या प्रचाराला बळ देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेतेदेखील एकटवले आहेत. त्यात शरद पवार नीलेश लंकेंच्या प्रचारासाठी सभांचा धुरळा उडवून देणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवारांची पहिली सभा 19 एप्रिलला सायंकाळी नगर शहरातील गांधी मैदानात होईल. या वेळी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे आणि काँग्रेस ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात या सभेला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर दुसरी सभा 25 एप्रिलला शेवगाव, 28 एप्रिलला राहुरी, 6 मे रोजी कर्जत, 8 मे रोजी श्रीगोंदा, 11 मे रोजी नगर शहरात पुन्हा सभा होईल.

भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत खासदार सुजय विखेंना उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासून खासदार विखेंनी प्रचारात आघाडी घेतली आहे. महायुतीत भाजपबरोबर असलेले इतर घटक पक्षदेखील प्रचारात उतरले आहेत. यानंतर नीलेश लंकेंनी आमदारकीचा राजीनामा देत शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. नीलेश लंकेदेखील ताकदीने मतदारसंघात प्रचारात लगेचच सक्रिय झाले आहेत. दोन्ही विरोधक एकमेकांना शह देण्यासाठी लढताना दिसत आहेत. यातच खासदार विखे यांचे वडील महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांच्या उमेदवारांची जबाबदारी घेतली आहे.

nilesh lanke sharad pawar sujay vikhe patil
Radhakrishna Vikhe Patil: मंत्री विखे थोरातांना का म्हणाले मौनीबाबा...

मंत्री विखेंनी गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. नगर जिल्ह्याचे सर्वाधिक वाटोळे शरद पवार यांच्या राजकीय स्वार्थापोटी झाल्याची जहरी टीका मंत्री विखेंनी केली. यानंतर विखेंनी शरद पवारांवर टीकेची धार आणखी वाढवलेली दिसते. याच बरोबर मंत्री विखे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यावरदेखील टीकेचे अग्निबाण सोडत आहेत. काँग्रेसचे प्रमुख नेते आणि राज्यातील ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरातांवर टीका करण्याची संधी मंत्री विखे सोडत नाहीत. या सर्वांचा समाचार शरद पवार त्यांच्या सभेत कशा पद्धतीने घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे. या सभांमधून शरद पवार नगर दक्षिणबरोबर जिल्ह्याचे राजकीय वातावरण फिरवणार, असे दिसते.

शरद पवारांच्या गाठीभेटी राजकीय गुंता वाढवणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार नगरमध्ये लोकसभा निवडणूक निमित्ताने येत आहेत. शरद पवारांनी नीलेश लंकेंना दोन वर्षापूर्वीच हेरले होते. शरद पवारांनी नीलेश लंकेंच्या घरी जात तसे संकेत दिले होते. यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेले. राष्ट्रवादी फुटली. नीलेश लंके अजित पवार गटात सामील झाले. त्यामुळे लोकसभेच्या मैदानात कोण? अशा चर्चेला सुरू झाल्या. राजकीय उत्सुकता वाढवून ठेवत नीलेश लंके शरद पवार गटात सामील झाले.

आता शरद पवार नगरच्या मैदानात सभे निमित्ताने येत आहेत. शरद पवार फक्त सभेला येत नाही, तर सभेला आल्यानंतर त्यामागील राजकीय गणिते घेऊन येतात. ही गणिते स्थानिक नेत्यांभोवती पेरण्यात त्यांचा हातखंडा आहे. सभेच्या व्यासपीठामागे शरद पवारांच्या होणाऱ्या गाठीभेटी बराच राजकीय संभ्रम निर्माण करतात. गुंता वाढवतात. याचीच धास्ती विरोधकांना असते, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.


( Edited By : Akshay Sabale )

R

nilesh lanke sharad pawar sujay vikhe patil
Shirdi Lok Sabha 2024: शिर्डीत ठाकरे-शिंदे शिलेदारांच्या बंद दाराआड जोरबैठका सुरु

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com