Dhule news : धुळे जिल्ह्यातील देवपुरातील गोंदूर रस्त्यावर सात वर्षांपूर्वी रावसाहेब पाटील आणि वैभव पाटील या बापलेकाची निर्घुण हत्या करण्यात आली होती. धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षांनी या प्रकरणी महत्वपूर्ण निकाल दिला आहे. माजी नगराध्यक्ष बाजीराव पवारसह १२ जणांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. दोषींना ११ मार्चला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
देवपूर परिसरात ८ जून २०१८ ला हे हत्याकांड घडलं होतं. पूर्ववैमनस्यातून रावसाहेब पाटील आणि त्यांचा मुलगा वैभव रावसाहेब पाटील या पिता-पुत्रांची निर्घृण खून झाला होता. घटनेनंतर देवपूर पोलिस ठाण्यात मुख्य सूत्रधारासह १३ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश जयश्री पुलाटे यांच्या न्यायालयात सुरू होती. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. देवेंद्रसिंह तवर यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. नीलेश दुसाणे यांनी सहाय्य केले. साक्षी पुरावे आणि युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सोमवारी (दि. ९) निकाल दिला.
न्यायालयाने सात वर्षांनी निकाल दिला असून एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली वैभव ऊर्फ सोनू अरुण पवार हा घटना घडली, त्या दिवशी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे असल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट झाल्याने न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. तर संदीप ऊर्फ विक्की दिलीप वेळीस या संशयिताला गुन्ह्यातील आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे.
एकुण १२ दोषींना याप्रकरणी ११ मार्चला शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यामुळे अवघ्या जिल्ह्याचे उद्याच्या सुनावणीकडे लक्ष लागून आहे. खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरविलेल्या १२ संशयितांना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होण्याची शक्यता विधी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
हे १२ जण आरोपी दोषी
न्यायालयाने माजी नगराध्यक्ष बाजीराव ऊर्फ सुभाष सजन पवार आणि गौरव बाजीराव पवार या बापलेकासह, भूपेश वाल्मीक पाटील, हर्शल ऊर्फ दादू रवींद्र पाटील, जयराज श्यामकांत पाटील, ऋषिकेश श्यामकांत पाटील, दर्शन अंबादास परदेशी, भगवान नानाभाऊ अहिरे, अर्जुन ऊर्फ आप्पा भगवान अहिरे, भूषण बाबुराव कापकर आणि भूषण निंबा पगारे या १२ संशयितांना भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये दोषी ठरविले.
या दुहेरी खुनाचा कट रचण्यात बाजीराव पवार, जयराज पाटील आणि ऋषिकेश पाटील यांचा सहभाग असल्याचेही न्यायालयाने निरीक्षणात नमूद केले आहे. जामिनावर असलेले बाजीराव पवार आणि दर्शन परदेशी या दोघांना तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शिक्षा सुनावणीपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवले जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.