Subhash Bhamre Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Constituency : सुभाष भामरे यांच्याविरोधात झळकले बॅनर; भाजपमधील वाद चव्हाट्यावर

BJP Political News : भामरे यांच्या उमेदवारी भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता. पण त्यानंतर त्यांनाच उमेदवारी जाहीर झाल्याने आता अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

Sampat Devgire

Dhule News : धुळे लोकसभा मतदारसंघातील (Dhule Lok Sabha Constituency) भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. मात्र, या उमेदवारीला आता मतदारसंघातून विरोध होऊ लागला आहे. धुळे आणि मालेगाव दोन्ही शहरांत त्याचे पडसाद उमटू लागल्याचे दिसते. भामरे यांच्याविरुद्धचा रोष आज एका फ्लेक्सद्वारे प्रकट झाला. त्याद्वारे भामरेंच्या उमेदवारीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

डॉ. भामरे (Subhash Bhamre) यांच्या लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) उमेदवारीला मतदारसंघातून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह अन्य इच्छुकांकडून मोठा विरोध होता. पक्षाच्या निरीक्षकांनी घेतलेल्या मुलाखतींमध्येदेखील पदाधिकाऱ्यांनी हा रोष व्यक्त केला होता. भामरे यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, असे वातावरण मतदारसंघात असल्याचे निरीक्षकांना सांगण्यात आले होते. त्यानंतरदेखील अनपेक्षितरित्या भाजपने (BJP) तिसऱ्यांदा भामरेंना उमेदवारी जाहीर केली.

या उमेदवारीबाबत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जाते. अन्य इच्छुकदेखील त्याला विरोध करीत आहेत. या संदर्भात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय नेतृत्वाला ई-मेल पाठवून भामरे यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी केली होती. हा विरोध रोज वाढतच आहे. त्यामुळे उमेदवार भामरे तसेच पक्षाचे नेतेही चिंतित झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मालेगाव (Malegaon) शहरात भामरे यांच्याविरुद्धचा रोष आज एका फ्लेक्सद्वारे प्रकट झाला. शहराच्या मध्यवर्ती भागातील मोसम पुलावर हा फलक झळकला होता. यामध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. गेली दहा वर्षे निष्क्रीय असलेल्या उमेदवाराला आपण स्वीकारणार का?, डॉक्टर भामरे यांनी गेल्या दहा वर्षांत धुळे आणि मालेगाव शहरात हिंदुत्वासाठी काय काम केले?, प्रकृती सक्षम नसताना उमेदवारी घेणारे उमेदवार आपल्याला चालतील का?, यासह विविध प्रश्न या बॅनरवर विचारण्यात आले होते.

हा बॅनर लागल्याची माहिती मिळताच खळबळ उडाली. अनेकांनी येथे बॅनर बघण्यासाठी गर्दी केली होती. आचारसंहिता असल्याने प्रशासनाने त्याची दखल घेत तातडीने तो बॅनर काढून घेतला. या बॅनरवर प्रकाशक तसेच तो कुठे छापण्यात आला, याची काहीही माहिती नाही. त्यामुळे पोलिसांना कोणाविरुद्ध कारवाई करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भारतीय जनता पक्षाने राज्यातील वीस उमेदवारांची यादी सर्वप्रथम जाहीर केली होती. यामध्ये भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. मात्र, त्यांच्या विरोधात पक्षातूनच जवळपास दहा इच्छुक आणि उमेदवारीसाठी मागणी केली होती. या सर्व परिस्थितीमुळे पक्षाला आता नव्या डोकेदुखीला सामोरे जावे लागत आहे. पक्षांतर्गत विरोध कसा संपुष्टात आणावा, हा नवा प्रश्न खासदार भामरे यांनादेखील आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत लवकरच बैठक घेऊन सर्व सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, एकंदर धुळे येथील विद्यमान खासदार भामरे यांना वाढता विरोध लक्षात घेता मतदारसंघातील मतदारांमध्ये वेगळा संदेश जाण्याची शक्यता आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT