shobha bachhav - Sharad Aaher Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress Politics : 'एमआयएम' नसल्यानेच धुळ्यात काँग्रेस जिंकली; काँग्रेस नेत्याची कबुली !

Sampat Devgire

Dhule News : धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ शोभा बच्छाव विजयी झाल्या. मात्र त्यांच्या विजयामध्ये काँग्रेस पदाधिकारी आणि उमेदवाराचा वाटा किती? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे एक वक्तव्य आले आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर राहिला. केवळ मालेगाव मध्य या मतदारसंघात काँग्रेसला मतांची मोठी आघाडी मिळाली. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी अवघ्या चार हजार मतांनी काँग्रेसच्या उमेदवार डॉ. बच्छाव निवडून आल्या.

या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शरद आहेर यांनी गुरुवारी एक बोलके वक्तव्य केले आहे.नाशिक शहरात झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी हे विधान केले. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह धुळे मतदार संघाच्या खासदार डॉ शोभा बच्छाव यादेखील उपस्थित होत्या. यावेळी आहेर म्हणाले, काँग्रेसच्या उमेदवार डॉ बच्छाव यांनी महिन्याभरात नवख्या असूनही धुळे मतदार संघात वातावरण निर्मिती केली. हे काम सोपे नव्हते. ऐनवेळी अनेकांनी त्यांचा गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या निवडणुकीबाबत खंबीर राहिल्या.

धुळ्याच्या निवडणुकीत मालेगाव मध्य मतदारसंघात 1.98 लाख मते काँग्रेसला मिळाली. भाजपला अवघी चार हजार मते आहेत. या ठिकाणी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नव्हता. अन्यथा या आघाडीला जवळपास 70 हजार ते एक लाख मते मिळतात असा अनुभव आहे. हे दोन्ही उमेदवार नसल्यामुळेच काँग्रेसला या मतदारसंघातील जवळपास सर्व मते मिळाली. केवळ त्यामुळेच काँग्रेसचा उमेदवार विजयी होऊ शकला. अन्यथा परिस्थिती अवघड होती.

धुळे मतदारसंघात बागलाण मधून गत निवडणुकीत भाजपला (BJP) 62 हजार मतांची आघाडी होती. यंदा ती 22 हजारांवर आली. मालेगाव बाह्य मतदारसंघात 86 हजारांवरून भाजपची आघाडी 42 हजार झाली. धुळे बाह्य मतदारसंघात 2019 मध्ये जवळपास एक लाख मतांनी भाजप पुढे होता. यंदा त्याला 62 हजारांची आघाडी आहे. धुळे शहरात भाजपची आघाडी 99 हजार मतांवरून 4 हजार एवढी घटली.

शिंदखेडा मतदारसंघात देखील काँग्रेसला यंदा भाजपची मतांची आघाडी 66 हजारांवरून वरून 42 हजार करता आली. त्यामुळे उर्वरित पाचही विधानसभा मतदारसंघात यंदाही भाजप आघाडीवर होता. मात्र केवळ मालेगाव मध्य मतदारसंघात मिळालेली लक्षणीय आघाडी एमआयएम या पक्षाच्या अनुपस्थितीमुळे काँग्रेसला यश देऊन गेली आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी होती. थोरात हे देखील उत्तर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात. धुळे आणि नंदुरबार या दोन जागा काँग्रेस पक्षाला सोडण्यात आल्या होत्या. या जागांवर पक्षाला यश मिळाले. त्याचे सर्व श्रेय थोरात यांनी केलेल्या राजकीय नियोजनाला जाते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने देखील त्याला महत्त्व आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT