Dilip Bankar & Anil Kadam Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आमदार दिलीप बनकर आणि अनिल कदम यांच्यात गट सांभाळण्यासाठी चुरस!

निफाड तालुक्यातील ४२ सोसायट्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला.

Sampat Devgire

पिंपळगाव बसवंत : निफाड (Niphad) तालुक्यातील ४२ विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. त्याचा जिल्हा बँक व बाजार समितीच्या राजकीय समिकरणांवर परिणाम होतो. त्यामुळे सहकारातील (Co-operative) गट सांभाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) यांच्यात चुरस निर्माण झाली आहे.

आगामी पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ४२ सोसायट्याचे निवडून येणारे संचालक हे मतदार असतील. त्यामुळे बाजार समितीच्या सत्तेसाठी आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम हे सोसायटीच्या निवडणुकीत आपल्याच गटाची सत्ता यावी म्हणून गावपातळीवरील राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पक्षविरहित गटा-तटांमध्ये लढतीचे स्वरूप आहे. बहुतांश सोसायट्यामध्ये दुरंगी लढतीचे चित्र असून पॅनल प्रमुखांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

पिंपळगाव बसवंत परिसरात जिव्हाळे, कोकणगांव, शेतकरी विविध कार्यकारी सोसायटी पिंपळगाव बसवंत, साकोरे मिग, पाचोरे वणी, कुंभारी, आहेरगाव, बेहेड आदी सोसायट्याच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी जाहीर झाली आहे. ४ मार्चला अंतिम मतदारयादी प्रसिध्द होऊन निवडणुकीचा धुराळा उडणार आहे.

प्रारूप मतदार यादी प्रसिध्द झाल्याने सोसायटीचे संचालक होण्यासाठी गाव पुढाऱ्यांची व्यूहरचना आखण्यास सुरवात केली आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी सहकार विभागाने मतदानाच्या अधिकारात मोठा बदल केला आहे. अक्रियाशील बिगर कर्जदार सभासद प्रथमच सर्व संचालकांसाठी मतदान करू शकतील. यापूर्वी फक्त एकच मताचा अधिकार होता. आता होऊ घातलेल्या सोसायट्याच्या निवडणुकीत या निर्णयामुळे सत्तेची गणिते यंदा बदलणार असल्याचे सहकार क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

जिल्हा बॅकेच्या माध्यमातून कृषीसाठी पतपुरवठा करणाऱ्या विकास सोसायट्यांच्या निवडणुकीत पहिल्यापासूनच कर्जदार व बिगरकर्जदार सभासद अशी वेगळी नोंदणी असते. त्यांना मतांचे अधिकारही असतात. कर्जदार सभासदांना बिगरकर्जदार एक प्रतिनिधी वगळता अन्य सर्व संचालकांसाठी मतदान करू शकत होते. बिगर कर्जदारांना फक्त एकच संचालक निवडून देण्याचा अधिकार होता. यंदाच्या निवडणुकीत सहकार कायद्यात निर्णायक बदल झाला आहे. बिगर कर्जदार सभासद नव्या नियमानुसार ज्या त्या सोसायटीच्या उलाढीवर ९,११ किंवा १३ संचालकांना मतदान करू शकणार आहेत. त्यात खुला गट, राखीव, महिला प्रतिनिधीचा समावेश आहे. थकबाकीदार सभासदांना मात्र मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT