राजेंद्र त्रिमुखे
Ahmednagar News : हलगीचा कडकडाट…ढोल-ताशांचा गजर… तुतरीच्या निनाद... काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मिरवणुकीचे हे चित्र पाहून आता निवडणुका दूर नाहीत अशीच चर्चा नगरमध्ये रंगली आहे. तो मिरवणुकीचा माहोल म्हणजे आगामी २०२४ च्या निवडणूक प्रचाराची अथवा ‘रोड शो’ची झलक वाटावी, असाच होता. तसेच, थोरातांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे मानले जात आहे. (Discussion of procession of Balasaheb Thorat in Ahmednagar district)
काँग्रेसचे विधीमंडळातील पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची संगमनेर (Sangamner) मतदारसंघातील रस्त्यांच्या कामाच्या शुभारंभाप्रसंगी स्थानिक ग्रामस्थांनी ही मिरवणूक काढली होती. त्याची चर्चा सध्या संगमनेरमध्ये रंगली आहे. थोरात यांच्या पाठपुराव्यातून रणखामवाडी ते कुंभारवाडी तसेच वरवंडी-दरेवाडी ते कवठे मलकापूर या रस्त्याच्या कामासाठी १६ कोटी ८ लाख रूपये मंजूर झाले आहेत. रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजनही मोठ्या जोषात करण्यात आला.
या कार्यक्रमात थोरातांनी राज्य आणि केंद्र सरकारची नीती आणि ध्येय धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भाजपवाले धर्माच्या नावावर राजकारण करत असून त्यांचे फोडाफोडीचे राजकारण जनतेला मान्य नाही. वाढती बेरोजगारी, महागाई यावर जनता नाराज असून मणिपूरमध्ये घडलेली घटना ही संपूर्ण मानव जातीसाठी अत्यंत वेदनादायी आहे.
मविआ सरकारच्या काळामध्ये तालुक्यातील विविध रस्त्यांसह पठार भागातील अनेक रस्ते मंजूर करून घेतले होते. मात्र, सरकार बदलले आणि नव्या सरकारने मंजूर झालेल्या कामांना स्थगिती दिली. या स्थगितीबाबत आपण सातत्याने आवाज उठवल्याने सरकारने स्थगिती उठवली आहे, असेही थोरात यांनी नमूद केले.
आमदार बाळासाहेब थोरात हे १९८५ पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे सलग आठ वेळा विक्रमी मताधिक्याने प्रतिनिधित्व करत आहेत. राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण अशी खाती त्यांनी सांभाळली असून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदावरही त्यांनी काम केले आहे. सध्या ते काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत.
या पार्श्वभूमीवर संगमनेर मतदारसंघात थोरात यांच्यापुढे अद्यापपर्यंत सक्षम विरोधक तयार झालेला नाही. मात्र, मागील वर्षी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूलमंत्री होताच त्यांनी संगमनेर मतदारसंघात अधिकचे लक्ष घातले. बदललेल्या वाळूविक्री धोरणात बदल घडवताना विखेंनी संगमनेर तालुक्यावर लक्ष केंद्रित केल्याचे बोलले जाते. अवैध वाळू तस्करांवर महसूल विभागाने केलेल्या कारवाया या थोरतांना अडचणीत आणण्यासाठी होत्या, अशी चर्चाही त्यामुळे सुरू झाली आहे. त्याला प्रत्युत्तरादाखल थोरातांनी गणेश कारखान्याच्या निवडणुकीत भाजपच्या कोल्हेंना साथ देत कारखान्यावरील विखेंची सत्ता काबीज केली.
अनेक पाहुणे आमच्याकडे येत आहेत, आम्हालाही भविष्यात त्यांच्याकडे जावे लागेल असा सूचक इशारा गणेश निवडणुकीत राधाकृष्ण विखेंनी थोरात-कोल्हेंना यांनाच दिला होता, हे उघड आहे. त्यामुळे थोरात-विखेंनी आपापल्या मतदारसंघात विविध कार्यक्रमांचा रतीब लावला असून विधानसभेला वर्षभरपेक्षा अधिक काळ असला तरी निवडणुकांचा फील आताच दिसू लागला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.