BJP Vs Shivsena News: जळगाव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिष्ठेची केली होती. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजपला कडवे आव्हान दिले. भाजपने महाराष्ट्रात केलेली राजकीय पक्षांच्या फोडाफोडीवर शिवसेनेने प्रचारात भर दिला. जळगाव मतदारसंघाची निवडणूक यंदा मंत्री महाजन यांच्या राजकीय प्रभावाची परीक्षा घेणारी ठरणार आहे.
निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी विद्यमान खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांची उमेदवारी नाकारली. त्या ऐवजी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष स्मिता वाघ (Smita Wagh) यांना उमेदवारी देण्यात आली. त्याचे पक्षात नकारात्मक पडसाद उमटले खासदार पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला. त्यामुळे पूर्ण निवडणुकीत भाजपला खासदार पाटील यांनी मोठे आव्हान निर्माण केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खासदार पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करून आपले मित्र करण पवार (Karan Pawar) यांना शिवसेना (Shisvena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी मिळवून दिली. प्रत्यक्षात करण पवार यांच्या ऐवजी खासदार पाटील हेच उमेदवार असल्यासारखी राजकीय स्थिती होती. ते पूर्वाश्रमीचे भाजपचे असल्याने गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांनी थेट महाजन यांना राजकीय आव्हान दिले. त्यामुळे हा प्रचार भाजपसाठी काहीसा बचावात्मक बनला. यामुळे निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात बहुतांशी सत्तास्थाने भाजपकडे आहेत. भाजपचे नेतृत्व गिरीश महाजन करतात. महाजन यांचा लहरी कारभार पक्षात असंतोषाचा विषय बनू शकतो. असे चित्र लोकसभा निवडणुकीत दिसून आले. 2019 च्या निवडणुकीत महाजन यांनी स्मिता वाघ यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द केली आणि उन्मेश पाटील यांना उमेदवारी दिली. यंदा ते चक्र त्यांनीच उलट फिरवले. त्यामुळे अनेकजण महाजन यांच्याबाबत नाराज झाल्याचे बोलले जाते. या निवडणुकीत भाजपने जळगाव मतदारसंघ गमावल्यास गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
जळगाव मतदारसंघात 2019 मध्ये भाजपला (BJP) शहरातून 71 हजार 713 मतांची आघाडी मिळाली होती. ही लक्षणीय मते मोदी लाटेमुळे मिळाली होती, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. यंदा मात्र जळगाव शहराच्या राजकारणात मोदी फॅक्टर प्रभावी दिसला नाही. त्या ऐवजी भाजपने राज्यात पक्षांची फोडाफोडी केली ते लोकांना पसंत नसल्याचा मुद्दा शिवसेनेने (Shivsena) सातत्याने मांडला.
शहरात मतदानाचा टक्का वाढला 4.41 टक्के अर्थात सतरा हजार मतदान वाढले आहे. मतदानाचा कल आणि मतदानातील वाढ ही सत्ताधारी पक्षाच्या कामकाजावर नापसंती दर्शविणारी देखील असू शकते. अशा स्थितीत भाजप आपले 71 हजारांचे मताधिक्य राखू शकेल का? हा प्रश्न उपस्थित होतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भाजपचे 71 हजाराचे मताधिक्य मोडून अधिक मते मिळविणार का? हा गंभीर प्रश्न आहे. यंदाच्या निवडणुकीत राज्यातील मतदानाचा कल लक्षात घेता, भाजपला जळगाव शहरात त्याचा फटका बसू शकतो. अशा स्थितीत भाजपने ही जागा गमावल्यास मंत्री महाजन यांच्या राजकीय नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. याचीच सध्या कार्यकर्त्यांत चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.