Vasant Gite & Dr Hemlata Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress : डॉ हेमलता पाटील यांची बंडखोरी, म्हणाल्या "काँग्रेस मला उमेदवारी देईल"

Nashik Central Assembly Constituency: नाशिक मध्य मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार वसंत गिते यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवारी अर्ज दाखल.

Sampat Devgire

Nashik News: गेल्या आठवड्याभर काँग्रेस पक्षाकडे नाशिक मध्य मतदारसंघात उमेदवारीसाठी तगादा लावलेल्या डॉ हेमलता पाटील यांनी बंडखोरी केली आहे. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

नाशिक मध्य मतदारसंघाच्या विविध उमेदवारांनी आज मोठे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार वसंत गीते यांची मिरवणूक. भाजपच्या शेवटच्या यादीत संधी मिळालेल्या आमदार देवयानी फरांदे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यानिमित्ताने नाशिक मध्य मतदारसंघ गेले महिनाभर चर्चेत होता. महाविकास आघाडीत अखेर बंडखोरी झाली आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी आमदार गिते यांना या बंडखोरांना थंड करण्यासाठी आणखी काही दिवस प्रयत्न करावे लागतील.

दोन दिवसांपूर्वी माजी आमदार गिते यांनी डॉ हेमलता पाटील यांची भेट घेऊन महाविकास आघाडीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. मात्र डॉ पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या. विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील डॉ पाटील यांनी उमेदवारी करू नये, अशी सूचना केली आहे.

या पार्श्वभूमीवरच आज डॉ पाटील यांनी नाशिक मध्य मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी काँग्रेस पक्ष आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

त्या म्हणाल्या, काँग्रेस पक्षाने नाशिक शहरात मध्य मतदारसंघ आपल्याकडेच ठेवायला हवा होता. पक्षाने मतदारसंघ सोडून आमच्यावर अन्याय केला आहे. मला अद्यापही खात्री आहे की, पक्ष मला न्याय देईल. लवकरच उमेदवार म्हणून जाहीर करेल.

डॉ पाटील यांच्या या भूमिकेने नाशिक मध्य मतदारसंघात बंडखोरी होणार, असे चित्र आहे. काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मात्र डॉ पाटील यांच्याबरोबर नव्हते.त्यामुळे डॉ. पाटील यांच्या सोबत पक्षातील कोण कोण जातात, हे लवकरच स्पष्ट होईल.

या मतदार संघ यंदा सुरुवातीपासून चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांच्याबाबत पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी गंभीर आक्षेप नोंदविले होते. त्यामुळे पक्षाच्या पहिल्या आणि दुसऱ्या यादीत आमदार फरांदे यांना उमेदवारी जाहीर झाली नव्हती.

भाजपच्या आमदार फरांदे यांना अनेक दिवस मुंबई पक्ष नेत्यांच्या भेटी घेत कार्यालयात तळ ठोकावा लागला होता. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात त्यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आता आमदार फरांदे आणि त्यांचे कट्टर विरोधक माजी आमदार वसंत गीते यांच्यात सामना रंगणार आहे.

या मतदारसंघात अन्य काही उमेदवारांनी देखील अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये काँग्रेसच्या डॉ पाटील यांच्याबरोबरच अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष हनीफ बशीर यांचाही समावेष आहे. त्यामुळे महायुतीशी सामना करताना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बंडखोरांशीही संघर्ष करावा लागेल, असे सध्याचे चित्र आहे.

काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी आणि इच्छुकांनी अद्यापही पक्ष उमेदवारी देईल, अशी आशा व्यक्त केली आहे. तसे न झाल्यास स्वतंत्र उमेदवारी करून सांगलीच्या धरतीवर वेगळा प्रयोग करण्याची तयारी काँग्रेस पक्षामध्ये सुरू आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत सगळ्यांचाच जीव टांगणीला लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT