Dr Rahul Aher, Devendra Fadanvis & Keda Aher Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics: केदा आहेर यांच्या दबावाला भाजपने अव्हेरले, चांदवड मतदारसंघात काय होणार?

BJP Candidate Chandwad 2024: स्थानिक भाजपच्या नेत्यांचा विरोध असताना आमदार सीमा हिरे आणि डॉ आहेर यांना उमेदवारी जाहीर.

Sampat Devgire

Chandwad Seat Election News: भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने आज राज्यातील 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये अनेक धक्कादायक नावे आहेत. विशेषता पक्षातील विरोधकांना पक्षाने कस्पटा समान लेखले आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये नव्या वादाची पेरणी झाली आहे.

भारतीय जनता पक्षाने नाशिक जिल्ह्यातून पाच पैकी चार विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाला थेट आव्हान देणाऱ्या नाफेडचे संचालक केदा आहेर यांच्या दबावाला पक्षाने फारशी किंमत दिली नाही. भाजपने विद्यमान आमदार व केदा आहेर यांचे बंधू आमदार डॉ. राहुल आहेर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

भाजपने आज आमदार डॉ राहुल आहेर (चांदवड), सीमा हिरे (नाशिक पश्चिम), राहुल ढिकले (नाशिक पूर्व) आणि दिलीप बोरसे (बागलाण) या चार विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केली आहे.. पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयातून याबाबतची यादी पक्षाचे मुख्यालय प्रभारी अरुण सिंग यांनी ही यादी जाहीर केली आहे.

चांदवड-देवळा मतदारसंघातून पक्षाने आमदार डॉ आहेर यांना उमेदवारी दिल्यास बंडखोरीचे आव्हान नाफेडचे संचालक व आमदार आहेर यांचे बंधू केदा आहेर यांनी दिले होते. त्याला पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी फारसे महत्त्व दिलेले नाही.

चांदवड मतदारसंघातून दोन दिवसांपूर्वी आमदार डॉ आहेर यांनी कुटुंबातील विरोधामुळे उमेदवारी करण्यास नकार दिला होता. यावेळी त्यांनी पक्षाचे उपमुख्यमंत्री आणि नेते देवेंद्र फडणवीस यांना देखील याबाबत कळविण्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी भाजपच्या नेत्यांनी केली होती, त्यामुळे या मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरीची चिन्हे आहेत.

नाफेडचे संचालक केदा आहेर या मतदारसंघातून उमेदवारीसाठी आग्रही होते. त्यांनी गेले सहा महिने प्रचार देखील केला होता. कोणत्या स्थितीत यंदा उमेदवारी करणारच असा त्यांचा हट्ट होता. मात्र आमदार डॉ आहेर यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर मतदार संघातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्याला विरोध केला होता. असाच विरोध आमदार देवयानी फरांदे यांनाही होता.

विद्यमान आमदार डॉ राहुल आहेर यांनाच उमेदवारी द्यावी यासाठी शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटले होते. या सर्व घडामोडीनंतरही पक्षाने आमदार डॉ आहेर यांना उमेदवारी जाहीर केली. केदा आहेर यांना पक्षाने आता कात्रजचा घाट दाखवला आहे.

त्यामुळे दुखावलेले केदा आहेर काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे. नाशिक पश्चिम मतदार संघात देखील अशीच स्थिती आहे. पक्षाच्या 16 माजी नगरसेवक आणि इच्छुकांनी विद्यमान आमदार हिरे यांना विरोध केला होता. सीमा हिरे यांना उमेदवारी देऊ नये, अन्य इच्छुकांपैकी कोणालाही उमेदवारी दिल्यास पक्ष सर्व समावेशक उमेदवार म्हणून त्याचा प्रचार करील असा दावा करण्यात आला होता.

असे असतानाही पक्षाने विद्यमान आमदार हिरे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे उमेदवारीसाठी निश्चिंत असलेल्या आमदार देवयानी फरांदे यांना पक्षाने मोठा झटका दिला आहे. आमदार फरांदे यांना पुन्हा उमेदवारी दिल्यास पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी बंडखोरीचा इशारा दिला होता.

आमदार फरांदे यांच्या विषयी अनेक तक्रारी होत्या काही वादग्रस्त प्रकरणांमध्ये त्यांचे नाव घेतले जात होते. उमेदवारी यादी त्यांचे नाव नसल्याने अनेकांना धक्का बसला आहे. आता दुसऱ्या यादीत आमदार फरांदे यांची उमेदवारी जाहीर व्हावी म्हणून आमदार फरांदे समर्थक कामाला लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT