Dr Shobha Bachhav, Malegaon Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr Shobha Bacchav: महापालिकेने कचराही सोडला नाही, थेट दुप्पट दराने काढली निविदा!

Sampat Devgire

Malegaon News: मालेगाव महापालिका सातत्याने चर्चेत असते. येथील प्रशासकांच्या कामकाजाच्या अनेक सुरस कथा बाहेर पडल्या आहेत. आता प्रशासनाने चक्क कचऱ्यातही भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे.

यासंदर्भात आम्ही मालेगावकर संघर्ष समूह आणि विविध संघटनांनी महापालिका विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात महापालिका आयुक्तांवर आरोप करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या निविदा ठराविक कंत्राटदारांना डोळ्यापुढे ठेवून तयार केल्या जातात, असा गंभीर आक्षेप आहे

काँग्रेसच्या खासदार डॉ शोभा बच्छाव यांनीही महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे. शहरात राज्य शासनाने बंदी घातलेल्या घातक कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. याबाबत तातडीने निविदाप्रक्रियेचे कामकाज थांबवावे, अशी मागणी त्यांनी केली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देण्यात आले आहे. मानवी आरोग्यास बाधक आणि घातक असलेल्या कीटकनाशकांची फवारणी महापालिकाचे प्रशासन कसे मान्य करते?. नागरिकांच्या आरोग्याचा विचार का होत नाही? हा चर्चेचा विषय आहे.

विशेष म्हणजे याबाबत सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त यांची भेट घेतली. हे कामकाज थांबविण्याचा इशारा दिला. मात्र त्याला प्रशासनाने अद्याप प्रतिसाद दिलेलं नाही.

अशाच प्रकारचा घोटाळा प्रशासनाने कचऱ्यातही केला आहे. या निमित्ताने कचऱ्याचे सोने करण्याचा प्रयत्न काही अधिकाऱ्यांनी चालविला आहे. त्यात त्यांनी स्वतःचे उखळ पांढरे करण्याचा डाव असल्याचा आरोप सामाजिक संस्थांनी केला आहे.

मालेगाव महापालिकेने यापूर्वी शहरातील कचरा उचलण्यासाठी बाराशे रुपये प्रति टन या दराने निविदा काढल्या होत्या. या स्थितीत कोणताही विशेष बदल झालेला नाही. तरीही सध्याच्या निविदा २४०० रुपये प्रति टन या दराने काढण्यात आले आहे. त्यात घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे.

मालेगावकरांचे कंबरडे मोडण्याचा हा प्रकार आहे. यात मोठा आर्थिक घोटाळा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची चौकशी करावी अशी मागणी खासदार डॉ बच्छाव यांनी केली आहे.

मालेगाव महापालिकेचा कारभार सध्या प्रशासक करतात. गेली काही वर्ष निविदांचे अनेक घोटाळे झाल्याचा आरोप होत आहे. विशेषतः शहरातील कर संकलन आणि भुयारी गटार योजनेचे काम दुप्पट दराने दिल्याचा आरोप यापूर्वी माजी आमदार आसिफ शेख यांनी केला होता.

मालेगाव शहरातील भुयारी गटार योजनेच्या निविदा दुप्पट दराच्या कशा झाल्या? हे गौडबंगाल अद्यापही कायम आहे. विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मतदार संघात हा सर्व प्रकार घडत आहे. त्यामुळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT