Eknath Khadse News: एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केले आहे. ते आम्हाला आजही आदरणीयच आहेत. त्यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. भाजपचे स्थानिक व वरिष्ठ नेते खडसे यांना सदैव पाण्यात पहात असतात. असे असताना बावनकुळे यांचे विधान चर्चेचा विषय ठरले आहे. (BJP leader Bavankule`s statement on Khadse may create new issue)
भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) सध्या पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी राज्याचा दौरा करीत आहेत. ते जळगाव (Jalgaon) येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याबाबत त्यांनी वरील विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातील मतभेद सर्वश्रृत आहेत. त्यांच्यात शेवटपर्यंत समेट होऊ शकला नव्हता. जळगावच्या व राज्याच्या राजकारणात फडणवीस यांचे विश्वासु सहकारी गिरीष महाजन सातत्याने खडसे यांच्यावर टिका करीत असतात. अनेकदा हा वाद एकेरीवर आलेला कार्यकर्त्यांनी पाहिलेला आहे. असे असताना बावनकुळे यांनी जळगावमध्ये येऊन केलेले विधान अनेकांच्या भुवया उंचावणारे आहे.
यावेळी एकनाथ खडसे भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत, त्यांची घरवापसी होतेय का? या प्रश्नावर श्री. बावनकुळे म्हणाले, ‘खडसे आमच्यासाठी आजही आदरणीय आहेत. आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. भाजपमध्ये असताना त्यांनी केवळ भाजपवर निष्ठा ठेऊन काम केले. आता त्यांनी वेगळा मार्ग निवडला आहे. त्यांच्याशी आजही आमचे चांगले संबंध आहेत. मात्र, त्यावरून त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही.’
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद प्रकरणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेबाबत केलेल्या वक्तव्यासंबंधी विचारले असता, श्री. बावनकुळे म्हणाले, की चंद्रकात पाटील यासंदर्भात नेमके काय बोलले, हे माहीत नाही. त्यामुळे त्या विषयावर बोलणे उचित नाही.
यावेळी श्री. बावनकुळे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर चांगलेच कोरडे ओढले. ते म्हणाले, भारतीय जनता पक्ष कधीही मुस्लिमविरोधी नव्हता. उलटपक्षी आपल्या सत्ताकाळातील ६५ वर्षांत काँग्रेस पक्षानेच मुस्लिमांना ‘कन्फ्यूज’ करीत त्यांचा केवळ मतांसाठी वापर करून घेतला. निवडणुका आल्या, की काँग्रेस पक्ष भाजपबाबत मुस्लिम समाजाची दिशाभूल करीत असतो. यावेळी जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, खासदार रक्षा खडसे, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, उपाध्यक्षा स्मिता वाघ, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.