Eknath Khadse Vs Devendra Fadnavis  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse : चर्चा भाजप प्रवेशाची! एकनाथ खडसे 'ती' पॉलिटिकल रिस्क घेतील का?

Devendra Fadnavis and Eknath Khadse meeting : गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Sampat Devgire

Eknath Khadse News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे सातत्याने बातम्यांचा विषय ठरतात. आताही ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याला कारणही तसेच घडले आहे. गेल्या आठवड्यात खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानिमित्ताने दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांना तासभर भेटले. यामध्ये राजकीय चर्चा झालीच नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. त्यामुळेच खडसे पुन्हा एकदा भाजपच्या मार्गावर असल्याच्या बातम्या बाहेर आल्या.

माजी मंत्री एकनाथ खडसे भाजपचे जुने, जाणते नेते होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते बारा खाते असलेले सर्वाधिक वजनदार मंत्री होते. त्यांना क्रमांक दोनचे मंत्री मानले जात होते. खडसे यांची देहबोली देखील प्रति मुख्यमंत्री अशीच असायची. त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना आरोपांच्या चक्रव्युहात अडकवून खड्यासारखे बाजूला केले.

खडसे यांनी प्रदीर्घकाळ विविध खटल्यांना तोंड दिले. खडसे भाजपमध्ये असताना भाजप सरकारने जे केले. त्यात त्यांच्या कुटुंबियांना अनेक कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे राजकीय दृष्ट्या त्यांचे खच्चीकरण करण्यात भाजप यशस्वी झाला. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जळगावचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या माध्यमातून ही कामगिरी फत्ते केली, हे लपून राहिलेले नाही.

वय आणि प्रकृती याचा विचार करता खडसे (Eknath Khadse) राजकीय विजनवासात राहणे अशक्य आहे. त्यामुळेच त्यांना सत्तेच्या पाठबळाची गरज आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याची चर्चा होती. या निवडणुकीत त्यांनी आपल्या स्नुषा भाजप उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार केला. त्या निवडून देखील आल्या. मात्र खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा अधांतरितच राहिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीने खडसे भाजपचा (BJP) पर्याय स्वीकारणार का? याची पुन्हा चर्चा सुरू झाली. आहे अर्थात खडसे यांच्या प्रवेशाला मुख्यमंत्री फडणवीस आणि जळगावचे मंत्री गिरीश महाजन सहजासहजी मान्यता देतील, असे दिसत नाही. मात्र राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. अशीच प्रतिक्रिया खडसे यांनी फडणवीस यांच्या भेटीनंतर दिली आहे.

खडसे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तरी ती त्यांची गरज असेल. सध्या भाजपचा रथ सत्तेमुळे जमिनी होऊन वीत भर उंचच उधळतो आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना सध्या तरी कोणाचीही गरज नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे खडसे भाजपमध्ये गेले तरी त्यांच्या हाती फारसे काही लागण्याची चिन्हे नाहीत.

खडसे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषद सदस्य आहेत. त्यांची मुदत 2026 अखेर आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करून ते विधान परिषद सदस्यत्वावर पाणी सोडतील का? हे पद सोडण्याची रिस्क भाजप प्रवेशासाठी त्यांना परबडेल का? असे अनेक प्रश्न आहेत. कारण भाजपमध्ये गेल्यावरही जळगावमध्ये जलसंपदा मंत्री महाजन त्यांना सहजासहजी स्वीकारतील, अशी चिन्हे नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT