Raksha Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raksha Khadse Politics: "एकनाथ खडसेंमुळेच मी जिंकले"... रक्षा खडसेंचा मॅसेज भाजपच्या कोणत्या नेत्याला?

Sampat Devgire

Jalgaon BJP News: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल अनिश्चितता आहे. याविषयी श्री खडसे यांनी नुकतेच आपल्या विरोधकांना सुनावले होते. त्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे आणि त्यांचे भारतीय जनता पक्षातील विरोधक ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी एकत्र यावे. तसे झाल्यास पक्षाला मोठा फायदा होईल. जळगावच्या राजकारणात भाजपला आणखी विस्तार करता येईल, असे मत व्यक्त केले आहे.

या निमित्ताने राज्यमंत्री खडसे यांनी केलेल्या विधानातून भाजपच्या कोणत्या नेत्याला हा अप्रत्यक्ष इशारा दिला, हे स्पष्ट आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा खडसे प्रकरणावरून भारतीय जनता पक्षात राजकीय तरंग उमटण्याची चिन्हे आहेत.

श्री खडसे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडण्याची घोषणा केली होती. भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी श्री खडसे यांनी चर्चा केली होती. त्यानंतर आपण भाजप पक्षात प्रवेश करू, असे त्यांनी जाहीर केले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी रक्षा खडसे यांचा प्रचार केला होता.

भाजपच्या केंद्रातील नेत्यांच्या एका गटाला श्री खडसे यांच्या विषयी सहानुभूती आहे. मात्र राज्यातील एक मोठा गट विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री महाजन हे खडसे यांचे पक्षांतर्गत विरोधक मानले जातात. हा गट श्री खडसे यांना प्रत्येक टप्प्यावर विरोध करीत आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर श्री खडसे यांनी घेतलेल्या निर्णयाचा फटका महाविकास आघाडीला बसला होता. या निवडणुकीत श्री खडसे यांनी रावेर मतदारसंघात क्रीडा राज्यमंत्री खडसे यांच्यासाठी प्रचार केला होता.

भाजपच्या अंतर्गत राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री खडसे यांनी, 'माझ्या विजयात श्री खडसे यांचा मोठा वाटा आहे. मला राजकारणात आणण्यात त्यांनीच भूमिका बजावली. त्यांचे आशीर्वाद सातत्याने माझ्या पाठीशी असतात. त्यामुळेच मी आज या टप्प्यावर पोहोचले आहे' असे विधान केले.

राज्यमंत्री खडसे यांनी अप्रत्यक्षरीत्या हा इशारा भाजपच्या कोणत्या नेत्यांना दिला, याची आता चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्याची सर्व सूत्रे ग्रामविकास मंत्री महाजन यांच्याकडे होती. महाजन यांनी खडसे यांच्या प्रवेशात अडथळे आणले, असे खडसे समर्थकांत बोलले जाते.

श्री खडसे यांच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशाबद्दल आपण विशेष काही बोलू शकणार नाही. हा विषय केंद्रीय नेतृत्वाच्या पातळीवर चर्चेत आहे. तेच याबाबत निर्णय घेतील. मात्र पक्षाच्या हिताच्या दृष्टीने खडसे आणि महाजन एकत्र आल्यास फायदाच होईल, असा सूचक संदेश राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी दिला.

श्री खडसे हे भारतीय जनता पक्षातील आक्रमक नेते मानले जातात. राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर जळगावच्या स्थानिक राजकारणात पुढे येण्याची संधी घेत ग्रामविकास मंत्री महाजन यांनी फडणवीस यांच्याशी जवळीक निर्माण केली.

या माध्यमातून त्यांनी सातत्याने खडसे यांना अडचणीत आणण्यासाठी कोणतीही संधी सोडली नाही. आता हे राजकारण एका वेगळ्या पातळीवर पोहोचले आहे. राज्यमंत्री खडसे यांनी या दृष्टीने एक सूचक इशारा दिला आहे. त्याचे जळगावच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नक्कीच पडसाद उमटतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT