Eknath Khadse : कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरण चर्चेत असतानाच यादरम्यान पुण्यातील बोपोडी येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी जमीन बळकावल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तब्बल नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात तहसीलदार सूर्यकांत येवले, दिग्विजय पाटील, जमीन विक्रेती शीतल तेजवानी तसेच बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांचा समावेश आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमेडीया कंपनी' व गावंडे यांच्या 'व्हिजन प्रॉपर्टीज' या संस्थांवर राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या सुमारे साडेपाच हेक्टर जागेवर अनधिकृत ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान याच हेमंत गावंडे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन प्रकरणात व्हिसल ब्लोअरची भूमिका बजावली होती. आता खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेत या घोटाळ्यासंबंधी सविस्तर माहिती दिली आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हा सर्व्हे क्रमांक 62, बोपोडी (पुणे) येथील जमिनीचा मामला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून ही जमीन स्वतःच्या नावावर करण्यात आली. ही जमीन मूळतः पेशव्यांची होती. उदरनिर्वाहासाठी पेशव्यांनी भट आणि विध्वंस यांना ही जमीन दिली होती. 1883 पासून ही जमीन सरकारी मालकीची असून कृषी विभागाच्या ताब्यात आहे. शिवाजीनगरसारख्या महत्वाच्या ठिकाणी ही सुमारे 1500 कोटी रुपयांची जमीन आहे. या जमिनीबाबत हेमंत गावंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुखत्यारपत्र तयार करून जमीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सरकारने ती मागणी नाकारली होती.
एकनाथ खडसे म्हणाले की, 2014 मध्ये या जमिनीवर टीडीआर मिळावा म्हणून संबंधितांनी पुणे मनपाकडे अर्ज दाखल केला होता. त्याच वर्षी रवींद्र बरहाते यांनी हा प्रकार माझ्या लक्षात आणून दिला होता. त्या वेळी मी टीडीआर मंजूर करण्यास नकार दिला. मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हा विषय मांडला होता. आपण विरोधी पक्षात होतो. ही जमीन सरकारची असल्याने आपण विरोध केला होता. त्यानंतर मी कृषी मंत्री झाल्यानंतर या जमिनीवर बेकायदेशीररीत्या ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे लक्षात आले. त्यामुळे बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात 2015 मध्ये हेमंत गावंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. काल दाखल झालेल्या गुन्ह्यातही हेच आरोपी आहेत. हा सराईत गुन्हेगार असून, आपण त्याला विरोध केला म्हणूनच हेमंत गावंडे यांनी भोसरी प्रकरणात आपल्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
ही जमीन मी त्याला न मिळू न दिल्याने त्याने भोसरी प्रकरणात माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला. या लोकांना मी पाठीशी घातलं नाही म्हणून या सर्वांनी भोसरी प्रकरणात माझ्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचे खडसे म्हणाले. दरम्यान काल झालेल्या एफआयआरमध्ये दिग्विजय पाटील हे अमेडीया कंपनीमधील पार्टनर आहेत. सरकारी जमीन विकण्याची या प्रकरणी चौकशी केली गेली पाहिजे. तहसीलदाराला अटक करून त्याची नार्को टेस्ट केली तर यात कोण सहभागी आहे हे समोर येईल. असेही खडसे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.