Maharashtra Politics : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कोट्यवधींच्या जमीन व्यवहारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप होत आहेत. एक हजार ८०० कोटींची जमीन अवघ्या ३०० कोटींत घेतल्याचा आरोपावरून राज्यात सध्या हा विषय चर्चेत आहे. या व्यवहारावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेरले आहे.
खडसे यांचे म्हणणे आहे की, भोसरी येथील जमीन व्यवहारात महसूलमंत्री असताना माझ्या कुटुंबावर आरोप झाले. वास्तविक जमीन खरेदी प्रकरणाशी माझा थेट संबंध नसतानाही मी नैतिकतेच्या आधारावर मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्याच धर्तीवर आता अजित पवार यांनीही नैतिक जबाबदारी स्विकारुन राजीनामा दिला पाहीजे असे खडसे यांचे म्हणणे आहे.
अशातच आता या वादात मंत्री गिरीश महाजन यांनी उडी घेतली असून खडसेंना डिवचले आहे. महाजन म्हणाले, खडसेंनी भाजपमध्ये असताना मंत्रिपदाचा राजीनामा नैतिकतेमुळे दिला नव्हता. खडसेंनी राजीनामा दिला नव्हता तर त्यांना तो द्यायला लावला होता. पक्षश्रेष्ठींनी त्यांना माझ्यासमोर राजीनामा देण्याचे आदेश दिले. राजीनामा दिला नाही तर हकालपट्टी करू, असा निरोप श्रेष्ठींकडून देण्यात आला होता असा दावा महाजन यांनी केला.
महाजन म्हणाले जेव्हा त्यांचे भोसरी भूखंड प्रकर समोर आले, तेव्हा त्यांना थेट दिल्लीहून सूचना देण्यात आल्या होत्या. खडसेंना पक्षाकडून स्पष्ट अल्टिमेटम देण्यात आला होता. खडसे यांना स्पष्ट सांगण्यात आलं होतं की, तुम्ही राजीनामा द्या, नाहीतर तुमची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल असा दावा महाजन यांनी केला आहे.
दरम्यान यावरुन खडसेंनी पुन्हा महाजन यांना प्रत्युत्तर दिलं. राजीनामा दिला, तेव्हा महाजन खूप लहान होते, असा टोला खडसे यांनी लगावला आहे. भोसरी जमीन व्यवहार प्रकरणात माझा काहीही संबंध नव्हता. त्या जमिनीच्या मूळ मालकाने माझ्याकडे निवेदन दिले होते, म्हणून त्या जमिनीशी संबंधित बैठक घेतली. तो व्यवहार कायदेशीरच होता. मात्र, लाभाच्या पदाच्या नुसत्या संशय आणि विविध माध्यमांमधून आरोप झाले होते. प्रकरण आपल्याशी संबंधित नसल्याने आपण त्याबाबत वरिष्ठ नेत्यांना भेटून समजावूनही सांगितले होते. मात्र, आरोपांची मालिका सुरूच राहिली व नैतिकता पाळत आपण राजीनामा दिला असं खडसे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.