Eknath shinde welcome Deepak Datir Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde Politics: भाजप कार्यालयावर हल्ला करणाऱ्याचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले स्वागत...काय आहे कारण?

Eknath Shinde; Deepak Datir attack BJP office, now felicitate Shivsena Shinde-शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक दीपक दातीर यांनी नवी दिल्ली येथे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला.

Sampat Devgire

Eknath Shinde News: राजकारणात काहीही घडू शकते, याची प्रचिती नुकतीच नाशिक शहराला आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक दीपक दातीर महायुतीचा घटक असलेल्या शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला आहे. त्यांचा प्रवेश वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय ठरला आहे.

दीपक दातीर हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आक्रमक नगरसेवक म्हणून परिचित आहेत. सिडको आणि अंबड परिसरात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केल्याने या पक्षाला त्याचा फायदा होणार आहे. मात्र त्यांचा प्रवेश चर्चेचा विषय आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते. तेव्हा भाजप नेते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्रीपदाचा अवमान होईल, असे वक्तव्य केले होते. त्याचे तीव्र पडसाद शिवसेना ठाकरे पक्षात उमटले.

त्याची प्रतिक्रिया म्हणून नगरसेवक दीपक दातीर यांनी शहरातील भाजपचे कार्यालय असलेल्या वसंत स्मृती येथे दगडफेक केली होती. कार्यालयाची मोडतोड करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली अनेक दिवस भाजप कार्यालयाला पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. यानिमित्ताने श्री दातीर चांगलेच हिरो ठरले होते.

आता माजी नगरसेवक दातीर यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. ते शिवसेनेच्या एकनाथ शिंदे पक्षात सामील झाले आहेत. या निमित्ताने ते भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीत सामील झाले आहे. त्यामुळे एक राजकीय वर्तुळ पूर्ण झाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले आहे. त्यांचा योग्य सन्मान केला जाईल, असे देखील प्रवेशाच्या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एक अर्थाने श्री दातीर यांना महापालिका निवडणुकीत उमेदवारीचे संकेत देण्यात आले आहेत. श्री दातीर यांना उमेदवारी मिळाल्यास ते महायुतीचे उमेदवार होतील. युती न झाल्यास शिवसेनेच्या शिंदे पक्षाचे उमेदवार असतील या दोन्ही स्थितीत त्यांचा शिंदे यांच्याकडून सन्मानच होणार आहे.

भाजपच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या दातीर यांना यानिमित्ताने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून गिफ्ट मिळाले असाच अर्थ निघू शकतो. त्यामुळे भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे पक्षाच्या दातीर यांचा प्रचार करणार का की, जुना वाद विसरून त्यांच्यात मनोमिलनाचे वारे वाहू लागतील, असे बोलले जाते.

श्री दातीर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर त्यांचे जुने सहकारी आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे बाळ दराडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. त्यात श्री दातीर यांचा शिवसेनेचा प्रवेशाचा फोटो आहे. त्याला "दोस्त दोस्त ना रहा, यार यार ना रहा" असे पार्श्व संगीत आहे. ही पोस्ट शहरात चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT