Eknath Shinde news : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना गोरगरीब, नागरिक व विशेषत: महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या. त्यामुळे महिलांकडे आता पैसा येऊ लागला आहे. त्यामुळे नवरा देखील आता बायकोकडून पैसे मागू लागला आहे. सख्खा भाऊ सुद्धा एकदाच पैसै देतो, पण शिंदेभाऊ दर महिन्याला पैसै देतो. म्हणूनच महिला त्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या आहेत. असे विधान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे शिवसेनेच्या वतीने महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी महिलांना एसटीमध्ये अर्ध्या भाड्यात प्रवासाची सवलत दिली. लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे यांनी सक्षम केल्यानेच आज नवरे बायकांकडे पैसे मागतात. ज्या बहिणीचा आशीर्वाद भावाला लाभतो, तो भाऊ फारच नशिबवान असतो. लाडक्या बहिणींमुळेच आम्ही निवडून आल्याचे गुलाबराव म्हणाले.
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, मी पाचव्यांदा आमदार राहिलो आहे. पण पण महिलांची एवढी गर्दी आजपर्यंत जमवू शकलो नाही. तळोद्यातील शिवसैनिक गोरगरीब महिलांसाठी काम करतात, त्यांच्या अडी-अडीचणीच्या काळात मदतीला धावून जातात. या ठिकाणी झालेली गर्दी त्यांच्या कामाची पावती आहे. त्यामुळे 'या बहिणी तुमले मत देवाशिवाय राहवावं न्हई' असं गुलाबराव पाटील तळोद्यातील शिवसैनिकांचे कौतुक करताना म्हणाले.
तळोदा शहरात शिवसेनेचा आमदार, खासदार नाही. तरी मेळाव्याला लाडक्या बहिनींनी एवढी गर्दी केली. ही तुमच्या कामाची साक्ष असून शिवसैनिकांनो, तुम्ही टेंशन घेऊ नका. महिलांची ही गर्दी आगामी निवडणुकांमध्ये तुमच्या मागे खंबीरपणे उभी राहील. जगात ज्याला बहीण, मुलगी नाही, तो कमनशिबी आहे. मी सहा महिन्यांचा असतांना माझी आई वारली. माझ्या काकूने मला मोठे केलं. मात्र, आज येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलेत माझी आई, बहीण मला दिसत असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.
यावेळी मेळाव्याला आमदार आमश्या पाडवी आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी हे देखील उपस्थित होते. त्यांनी तळोद्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटीबद्ध असल्याचे भाषणातून सांगितले. या मेळाव्यात यशवंत पाडवी, विक्रम पाडवी, सुरेश वळवी, कपिल कर्णकार, रवींद्र वळवी, निलेश वळवी यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.