Eknath Shinde & Ravindra Chavhan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचा अल्टिमेटम ठरला पोकळ, तिथे मंत्र्यांना कोण जुमानणार?

Eknath Shinde on Mumbai Highway Potholes : मुंबई महामार्ग आणि शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांनी त्रस्त नाशिककरांना दिलासा कोण देणार?

Sampat Devgire

Ravindra Chavhan News: मुंबई महामार्गावरील खड्डे आणि वाहतूक कोंडी नाशिककरांना असह्य झाली आहे. यासंदर्भात विधिमंडळात चर्चा होऊनही दिलासा मिळालेला नाही. आता यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उडी घेतली आहे.

नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि नादुरुस्त रस्ता हा सगळ्यांनाच त्रस्त करणारा विषय आहे. राजकीय नेत्यांपासून तर मंत्र्यांपर्यंत सगळ्यांना त्याचा फटका बसला आहे. नागरिक या समस्येतून केव्हा सुटका होणार? यासाठी देवाकडे धावा करण्याचे शिल्लक राहिले आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळातील चर्चेनंतर कारवाईचा इशारा दिला होता. मुख्यमंत्री शिंदे यांनी महामार्गाच्या नादुरुस्त भागाला भेट देऊन संबंधितांची चर्चा केली. यावेळी आठ दिवसात समस्येचे निराकरण न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार, अशी घोषणा झाली होती.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या या घोषणेला आता तीन आठवडे उलटले आहेत. विधिमंडळाचे अधिवेशन आटोपले आहे. त्यामुळे राजकीय नेते आणि अगदी विरोधी पक्षाला देखील या समस्येचा विसर पडला आहे. मात्र महामार्गावरील वाहतूक कोंडी व खड्डे ही समस्या सुटलेली नाही. टोल वसुली जोरात सुरू आहे.

सामान्य नागरिक मात्र या वाहतूक कोंडीतून अद्यापही सुटू शकलेले नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी याबाबत तक्रारी करणेच बंद केल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. या प्रश्नाच्या विरोधात राजकीय नेत्यांची आंदोलने देखील निष्प्रभ झाली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी महामार्गावरील खड्डे दुरुस्त करणे, वाहतूक कोंडी सुरळीत करणे यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार होती, मात्र काहीही झालेले नाही. या अल्टिमेटमचा काहीही परिणाम झाला नाही. तो पोकळ ठरला.

आता त्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उडी घेतली आहे. मंत्री चव्हाण यांनी नाशिक येथे जिल्हा विश्रामगृहात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यासंदर्भात येत्या महिन्याभरात रस्त्यावरील सर्व खड्डे बुजविण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.

खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पुरेसा निधी देखील उपलब्ध आहे. त्यामुळे यात कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा मंत्री चव्हाण यांनी केला. केंद्र आणि राज्य सरकारची विविध कामे सुरू आहेत. त्यामुळे अडचणी येतात, असे मंत्री म्हणाले.

महामार्गांवरील विविध कामांचाही आढावा त्यांनी घेतला. या कामांना गती देण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत एक महिन्यात ही सर्व कामे संपवावीत, असे आदेश त्यांनी दिली आहेत. यामध्ये दिरंगाई झाल्यास दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांसह जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. राज्य शासनाने विधिमंडळात दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला. तोही पोकळ ठरला. आता मंत्र्यांचे तरी आदेश पाळले जातील का? असा प्रश्न विचारला जात आहे.

जिथे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला कोणी जुमानत नसेल, तिथे मंत्र्यांचे काय होणार? हा नागरिकांमध्ये चर्चेचा विषय आहे. एकंदरच मुंबई महामार्गावरील खड्डे आणि वाहतूक कोंडी आणि शहरात पावसामुळे निर्माण झालेले नादुरुस्त रस्ते हा आता पाचवीला पुजलेला प्रश्न आहे. तो सोडविण्यासाठी कोण पुढाकार घेणार याचीच उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT