Badlapur School Case: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग शिवसेना आदित्य ठाकरे यांनी नाशिक येथून फुंकले. शिवसेना समर्थकांच्या प्रचंड गर्दीत त्यांच्या यात्रेची सुरुवात झाली. यावेळी ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बदलापूर प्रकरणात अक्षरशःवस्त्रहरण केले.
शिवसेना नेते ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा मेळावा झाला. यावेळी ठाकरे यांनी जोरदार बॅटिंग केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बदलापूर आणि महिला सुरक्षा या विषयावर त्यांनी अक्षरश: वस्त्रहरण केले. बदलापूर येथे न्यायासाठी जनता आक्रोश करत होती, तेव्हा गृहमंत्री दिल्लीत स्वतःला काय मागण्यासाठी गेले होते, असा प्रश्न त्यांनी केला.
श्री. ठाकरे यांनी यावेळी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला. बदलापूर मध्ये चिमूरडीवर अत्याचार झाला. जनता रस्त्यावर उतरली होती. रेल्वे मार्ग ठप्प झाला होता. जनता न्याय मागत असताना राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री तेव्हा कुठे होते? तिथे जाण्याची त्यांची हिंमत का झाली नाही?
तेव्हा गृहमंत्री आपल्या राजकारणासाठी दिल्लीत बसले होते. स्वतःसाठी काहीतरी मागायला गेले होते. सुपर शेतकरी असलेले मुख्यमंत्री पौर्णिमा आणि अमावस्येलाच आपल्या शेतात का जातात? आणि काय करतात? हेच मला जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
मंत्री फडणवीस यांना त्यांनी थेट जनरल डायरची उपमा दिली. ते म्हणाले, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी देखील मी चर्चा केली आहे. अंतरवेली सराटी येथे शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या. निरपराध महिलांवर लाठीमार करण्यात आला.
बदलापूरला न्याय मागणाऱ्या जनतेवर देखील बेछूट लाठीमार झाला. असे आदेश देणारा जनरल डायर कोण? हे जाणून घेण्याची सबंध महाराष्ट्राला उत्सुकता आहे. आमचे सरकार येताच हा जनरल डायर कोण आहे, त्याचे नाव जाहीर केले जाईल. त्याच्या विरोधात कारवाई केली जाईल.
बदलापूर येथे आंदोलन करणाऱ्या जनतेवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले. महिला पत्रकाराला मुख्यमंत्र्याच्या निकटवर्तीयाने अतिशय अश्लाघ्य शब्दात सुनावले.
एवढेच नव्हे तर किसन कोतारी या भाजपच्या नेत्यांनी बदलापूरची घटना ही राजकीय आहे, असे थिल्लर विधान केले. मुख्यमंत्री देखील दाढी खाजवत हे राजकारण आहे, असे म्हणत होते. या सर्व बाबतीत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महिलांची माफी मागणार आहेत का, असे कृत्य करणारे मिंधे सरकारवाले कोणाचे भाऊ होऊ शकतील का? हा प्रश्न मला महिलांना विचारायचा आहे.
आदित्य ठाकरे यांच्या या विधानावर उपस्थित महिलांनी मुठी आवळून हात उंचावत निषेधाच्या घोषणा दिल्या. श्री. ठाकरे यांनी पोलिसांच्या आणि राज्य सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केला.
ते म्हणाले, मुलीवर अत्याचार झाला म्हणून तक्रार करार करायला गेलेल्या महिलेला दहा तास पोलीस ठाण्यामध्ये बसवून ठेवण्यात आले. न्याय मागणाऱ्या ३०० जणांवर चुटकीसरशी एफआयआर दाखल करण्यात आला.
या आंदोलन करणाऱ्या जनतेला बलात्कार करणाऱ्या पेक्षा जास्त दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांचा गुन्हा काय?. या राज्यामध्ये काय चालू आहे. या सगळ्यांनी राज्यघटना गुंडाळून ठेवली आहे. राज्यघटना बदलण्याचे षडयंत्र लोकसभा निवडणुकीनंतर थांबलेले नाही. ते सुरूच आहे. खरी लढाई आता सुरू झाली आहे, असा दावा त्यांनी केला.
यावेळी माजी आमदार वसंत गीते, उपनेते सुनील बागुल, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, खासदार राजाभाऊ वाजे, दत्ता गायकवाड, माजी आमदार योगेश घोलप यांसह विविध नेते व्यासपीठावर होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.