Vikas Bhujade & Bhausaheb Choudhary Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde Politics: चांदवड मतदार संघात शिंदे गटात विधानसभेच्या तोंडावरच धुसफुस, `हे` आहे कारण!

Eknath Shinde Camp Conflict in Chandwad Ahead of Elections: चांदवड तालुकाप्रमुख विकास भुजाडे यांना वरिष्ठ नेत्यांनी पदमुक्त केल्याने खळबळ.

Sampat Devgire

Chandwad Constituency News: महायुतीतर्फे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे. यामध्ये मुख्यमंत्री शिंदे गटाकडून देखील स्वतंत्रपणे चाचणी केली जात आहे. मात्र या पर्यायी यंत्रणेमुळेच चांदवड विधानसभा मतदारसंघात सहकाटशहाचे राजकारण रंगले आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे गटातर्फे चांदवड तालुकाप्रमुख भुजाडे यांच्यावर वरिष्ठांनी कारवाई केली. त्यांचे पद काढून घेण्यात आले. आता नवे तालुका प्रमुख म्हणून निलेश ढगे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे.

या निमित्ताने शिंदे गटाला चांदवड विधानसभा मतदारसंघात नव्याने पक्षाची उभारणी करावी लागणार आहे. पक्षातील नेत्यांमध्ये हा निर्णय घेण्याची वेळ का आली?. यामागे वेगळे काही राजकारण आहे का? याची जोरदार चर्चा आहे.

या चर्चेच्या मुळाशी शिंदे गटाकडून महायुतीत स्वतंत्र लढण्याची वेळ आल्यास प्रत्येक विधानसभेत आपली यंत्रणा निर्माण करणे यावरून राजकारण घडल्याचे पुढे आले आहे.

चांदवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे डॉ राहुल आहेर विद्यमान आमदार आहेत. गेले दोन टन ते आमदार असून त्यांचा मतदारसंघावर चांगला वरचष्मा आहे. विविध विकासकामांच्या माध्यमातून त्यांचा संपर्क देखील चांगला आहे.

मात्र दुसऱ्या टर्ममध्ये भाजपने शिवसेना शिंदे गटासमवेत सरकार स्थापन केले. त्यामुळे भाजपचे आमदार असलेल्या राज्यातील मतदार संघांत देखील त्यांचाच सहकारी असलेल्या पक्षाने प्रतिस्पर्धी म्हणून हात पाय पसरवायला सुरुवात केली आहे.

त्याचे परिणाम चांदवड मतदार संघात दिसून आले. या मतदार संघात विकास भुजाडे हे तालुकाप्रमुख आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनकल्याण कक्ष या स्वतंत्र यंत्रणेमार्फत मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पक्षाच्या विस्तारासाठी विधानसभा निहाय यंत्रणा निर्माण केली जात आहे.

या यंत्रणेत चांदवडमध्ये श्री भुजाडे यांनी लक्षात राहील असे काम केल्याचा दावा केला आहे. तालुक्यातील सर्व १८६ बुथवर त्यांनी यंत्रणा उभी केली. साडेतीन हजार कार्यकर्त्यांची यंत्रणा शिंदे गटासाठी काम करीत आहे, असा त्यांचा दावा आहे.

यातून स्वबळावर निवडणूक करण्याचे ठरल्यास विकास भुजाडे आणि संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी हे दोन प्रबळ उमेदवार म्हणून चर्चेत होते. यात भुजाडे हे स्थानिक आणि नवे असतानाही त्यांचे बस्तान कसे बसले? हे अनेकांना खटकले. यातूनच शहकाटशहाचे राजकारण रंगले आहे.

श्री भुजाडे यांना स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठीच त्यांना पदमुक्त केले नाही ना? असे बोलले जाते. या संदर्भात संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे अनेक तक्रारी गेल्या होत्या. कांदा खरेदीशी संबंधीत या तक्रारी असल्याचे कळते. त्यामुळे खबरदारी म्हणून श्री. भुजाडे यांना बाजूला करण्यात आल्याचा दावा नेत्यांनी केला आहे.

श्री भुजाडे हे पालकमंत्री दादा भुसे यांचे निकटवर्तीय मानले जातात. भुजाडे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर सामूहिक राजीनामे दिले. मात्र पालकमंत्री भुसे यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात हे सर्व पदाधिकारी पालकमंत्र्यांची चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय घेणार आहेत.

या निमित्ताने महायुतीत एकाच वेळी घटक पक्ष देखील परस्परांना शह देण्याची तयारी करीत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपच नव्हे तर निवडणूक देखील एकोप्याने लढली जाईल का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT