Amol Khatal on Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Amol Khatal on Balasaheb Thorat : 40 वर्षांत बहीण, मुलगी, जावई, भाचा यांचाच विकास झाला; आमदार खताळांचा थोरातांना झोंबणारा टोला

Eknath Shinde Sangamner Rally Amol Khatal Targets Congress Leader Balasaheb Thorat : संगमनेर इथल्या आभार सभेत शिवसेना आमदार अमोल खताळ यांनी काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका केली.

Pradeep Pendhare

Eknath Shinde Sangamner rally : शिवसेनेचे संगमनेरमधील आमदार अमोल खताळ यांनी नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित झालेल्या आभार सभेत काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ही टीका करताना, त्यांनी थोरात यांचा खुबीनं नाव टाळलं.

"'हम यारों के हैं यार, वफादारों के हैं दिलदार, हमसे मुकाबला ना कर वरना घूमते रहोगे दर-बदर,' हा शेर म्हणत, संगमनेरचा आता खरा विकास होत आहे. गेल्या 40 वर्षांत, बहीण, मुलगी, जावई, भाचा यांचाच विकास झाला. एक शेतकऱ्याचा मुलगा आमदार झाला हीच त्यांची खंत आहे,” असा झोंबणारा टोला अमोल खताळ यांनी थोरातांना लगावला.

अमोल खताळ म्हणाले, "मागील आठ महिन्यांच्या आमदारकीच्या काळात टीका-टिप्पणी करण्यापेक्षा आपण विकासकामांना प्राधान्य दिले. कोणता कारखाना नाही की, शिक्षण संस्था नाही, दूध संघदेखील नाही; तरी हजारो कार्यकर्ते मागे उभे आहेत." अनेक वर्षे संगमनेरला पाण्यापासून वंचित ठेवले. यापूर्वीच्या नेतृत्वाने पाण्यासारख्या मुलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच स्वतःला जननायक म्हणवणाऱ्यांना जनतेने घरी बसवले, अशी टिप्पणी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा नामोल्लेख टाळून खताळ यांनी केली.

'चार दिवसांपूर्वी त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी एका प्रवचनकारावर हल्ला केला होता. जनतेने त्यांना नाकारल्यामुळे राजकारणात सक्रिय होण्यासाठी खोटेनाटे प्रकार सुरू केले आहेत. खोटे व्हिडिओ बनवून वायरल केले जात आहेत', असा टोलाही शिवसेनेच्या (Shivsena) खताळ यांनी लगावला.

'संगमनेर इथला शेतकरी आणि उद्योजकांनी स्वतःच्या हिमतीवर यश मिळवले आहे. यापूर्वी व्यापारी दहशतीच्या वातावरणात होते, असे सांगताना खताळांनी व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्या खंडणीखोरांना थेट इशारा दिला. यापुढे खंडणीच्या माध्यमातून व्यापाऱ्याला त्रास दिला, तर गाठ माझ्याशी आहे. तसेच, महायुतीच्या कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लागला, तर गाठ माझ्याशी आणि महायुतीच्या नेत्यांशी आहे. मी सत्ताधारी पक्षात आहे, हे ठणकावून सांगताना त्यांनी एकेरी भाषेत, तुला सत्ताधारी कोणाला म्हणतात माहीत आहे का? असा सवाल केला. नुसता फोटो काढला आणि व्हायरल केला म्हणजे सत्ताधारी पक्ष होत नाही', असा टोला त्यांनी लगावला.

मामा-भाचे विरोधातच...

लोकसभा निवडणुकीत माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात मामा-भाच्याने एकत्र काम केले. “मामा विरोधात होतेच, पण भाच्यानेही त्यांना साथ दिली”. विधानसभा निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी आपल्याविरोधात काम केल्याचा उल्लेख खताळ यांनी केला. “संगमनेर हा शेतीप्रधान तालुका आहे. अजित नवले यांच्यासारख्यांनी दूध क्रांती आणली. याउलट राजहंस दूध संघ कशा प्रकारे शोषण करत असल्याबाबत एक चिठ्ठी शेतकऱ्याने दिली,” असे ते म्हणाले. “आता संगमनेर तालुक्यात दहशत आहे का? असा प्रश्न करत यापुढे दहशत खपवून घेतली जाणार नाही,” असे आमदार खताळ यांनी स्पष्ट केले.

नगरपालिकेत भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

संगमनेर नगरपालिकेत मागील दहा वर्षांत भ्रष्टाचार झाला आहे, त्याची चौकशी करावी, याकडे खताळ यांनी लक्ष वेधले. गेल्या कित्येक वर्षांपासून लोक वाट पाहत होते की येथे परिवर्तन व्हावे. मंचावर असणाऱ्यांनी अनेकदा निवडणुका लढवल्या, पण प्रयत्न करूनही अपयश आले. त्यांच्या संघर्षामुळे आज हा सोनेरी दिवस उगवला आहे. “चार दिवसांपूर्वी मोर्चे काढून आमदाराने विकास करावा असे मला सांगितले गेले. आज आठ महिन्यांनी प्रत्युत्तर देण्यास त्यांनी मला भाग पाडले. अन् देणार! आठ महिन्यांपासून विकासाची घोडदौड सुरू आहे. ती पाहून राजकीय पुनरुज्जीवनासाठी तुमची केविलवाणी धडपड सुरू आहे,” अशी टीका त्यांनी माजी आमदार थोरात यांच्यावर केली.

खताळांचा सूचक शेर

“मला तुमच्या सल्ल्याची गरज नाही. मला सल्ला देण्यासाठी शिंदे, पवार, फडणवीस, विखे पाटील आहेत. त्यांची ताकद माझ्यामागे आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. “हम यारों के हैं यार, वफादारों के हैं दिलदार, हमसे मुकाबला ना कर वरना घूमते रहोगे दर-बदर,” हा शेर खताळ यांनी उद्धृत केला. आमचा शेर नेमक्या व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचला असेल, अशी टिप्पणी देखील त्यांनी केली.

आता खरा विकास होतोय

“निवडणुकीच्या आधी मला ‘खबऱ्या’ म्हणून हिणवले गेले, पण निकालानंतर राज्य आणि देशातील सगळ्या माध्यमांमध्ये मी ‘खबर’ बनलो. खबऱ्या म्हणा नाहीतर खेळणं म्हणा – खेळणं मी नव्हे तर मतदारांनी तुमच्या हातात खुळखुळा दिला आहे,” असा टोला त्यांनी लगावला. ते म्हणतात विकास झाला, पण तुमच्या बहीण, मुलगी, जावई, भाचा यांचा विकास झाला. खरा विकास आता होतो आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा आमदार झाला हीच त्यांची खंत आहे,” असा टोलाही आमदार खताळ यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT