Mumbai News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज्यात 'ऑपरेशन टायगर' सुरू आहे. यात सर्वाधिक झळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला बसत आहे. ठाकरेंची शिवसेना यातून पूर्णपणे खिळखिळी होताना दिसते आहे. यातच शिंदेंच्या शिवसेना पक्षाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या दिल्लीतील स्नेहभोजनाला ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदारांनी हजेरी लावल्याने राज्यातील राजकारणात तापले आहे.
अशातच शरद पवार यांचे लाकडे खासदार नीलेश लंके यांनी देखील या स्नेहभोजन कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे समोर आल्याने 'ऑपरेशन टायगर'ची झळ ठाकरेंच्या शिवसेनेसह पवारसाहेबांच्या पक्षाला पण बसणार, अशी चर्चा रंगली आहे.
प्रतापराव जाधव यांनी दिल्लीतील निवासस्थानी बुधवारी 12 फेब्रुवारीला रात्री स्नेहभोजन आयोजित केले होते. ठाकरेंचे तीन खासदार उपस्थित असल्याचे बोलले जाते. परभणीचे खासदार संजय जाधव, खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी (Shirdi) लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे देखील उपस्थित होते.
खासदार वाकचौरे यांनी या स्नेहभोजन कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यावरची प्रतिक्रिया देताना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे खासदार नीलेश लंके देखील उपस्थित होते, असे सांगितले. खासदार वाकचौरे यांच्या या दाव्याने शिंदेंच्या शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'ची अधिक चर्चा रंगली आहे.
खासदार वाकचौरे म्हणाले, "खासदार प्रतापराव जाधव हे दिल्लीतील एकेकाळचे माझे शेजारी आहेत. त्यांनी जेवणाचे निमंत्रण दिले. खासदार नीलेश लंकेंसह तिथं विविध पक्षांतील नेते, खासदार उपस्थित होते". या निमंत्रणाचे वावगे काय? यातून फक्त बातम्या होतील. दुसरे काही होणार नाही आणि माझी करमणूक होत आहे, असेही खासदार वाकचौरे यांनी म्हटले.
'आदित्य ठाकरे दिल्लीत असताना खासदार संजय राऊत यांच्यासमवेत त्यांच्याबरोबर पक्षातील खासदारांनी भोजन घेतले. अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. आदित्य ठाकरेंनी या स्नेहभोजनाबद्दल एका शब्दाने देखील विचारणा केली नाही. मी पण खासदार जाधवांकडे जाणार नव्हतो. पण त्यांनी फार आग्रह केला. ते माझ्याकडे एक-दोनदा आले होते, त्यात वावगे काय?', असेही खासदार वाकचौरे यांनी म्हटले.
"शिंदेंच्या संपर्कात आहे का? या प्रश्नावर खासदार वाकचौरे म्हणाले, अशा बातम्या येत असतात. पण त्याने काहीही फरक पडणार नाही. दिल्लीत एकनाथ शिंदेंचा सत्कार झाला. माझ्या दिल्लीतील वास्तव्याच्या ठिकाणाहून काही अंतरावर हा कार्यक्रम होता. पण मी गेलो नाही. आम्ही ठाकरेंसोबत आहोत. सर्व खासदार ठाकरेंबरोबरच राहणार आहोत", असे खासदार वाकचौरे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.