Jalgaon Political News: जळगाव जिल्ह्यात शरद पवार यांच्या पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. दोन माजी आमदार व दोन माजी मंत्र्यांनी अजित पवार यांचे घड्याळ हातात बांधले आहे. सुरुवातीला दोन माजी मंत्री व तीन माजी आमदार अजित पवार गटात जाणार अशी चर्चा होती. परंतु प्रत्यक्षात दोनच माजी आमदारांनी अजित पवार गटात प्रवेश केला. पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांचेही नाव संभाव्य प्रवेश घेणाऱ्यात होते. मात्र त्यांनी प्रवेश टाळला.
मी अजित पवार गटात जाणार असल्याची निव्वळ अफवा होती असा दावा दिलीप वाघ यांनी केला आहे. दिलीप वाघ हे अजित पवार गटात जातील असं म्हटलं जात असताना प्रत्यक्षात ते राष्ट्रवादीच्या प्रवेश सोहळ्यात फिरकलेही नाही. त्यांनी सोहळ्याला जाणं टाळलं.
मी सध्या कोणत्याच पक्षात नाही. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यांच्याशी माझी चर्चा सुरू आहे. त्यामुळे इतर पक्षात जाण्याचा प्रश्नच येत नाही, अशी माहिती दिलीप वाघ यांनी दिली आहे. दिलीप वाघ यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे अजित पवारांच्या गोटात जाणार एक नेता कमी झाला हे मात्र खरं.
दिलीप वाघ हे शरद पवारांचे (Sharad Pawar) खंदे समर्थक होते. राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने ते पाचोरा मतदारसंघाचे आमदार झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यामागे महायुतीची उमेदवारी त्यांना मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु महायुतीच्या वाटाघाटीत पाचोरा विधानसभेची जागा शिवसेना शिंदे गटाला गेली. त्यामुळे वाघ यांना उमेदवारी मिळू शकली नाही.
दिलीप वाघ यांनी शेवटी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु निवडणुकीत त्यांना अपयश आलं. शरद पवारांचा पक्ष सोडून अजित पवारांकडे जावूनही उपयोग झाला नाही. म्हणून आता वाघ यांना सत्तेची उब हवी आहे. भाजप शिवाय पर्याय नाही हे त्यांनी ओळखलं. त्यादृष्टीने ते भाजपात प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. मात्र त्यावेळी फडणवीस यांनी वाघ यांना काही दिवस थांबण्याचा सल्ला दिला होता.
दिलीप वाघ यांना भाजपमध्ये प्रवेश मिळाल्यास पाचोरा मतदारसंघात शिवसेना शिंदे पक्षाची कोंडी होऊ शकते. त्याच भीतीने माजी आमदार वाघ यांचा भाजप प्रवेश होऊ शकला नाही असं सांगितलं जातं. त्यामुळे ते गुलाबराव देवकर व सतीश पाटील यांच्यासोबत अजित पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र त्यांना भाजपची (BJP) ओढ असल्याने त्यांनी अजित पवार यांच्या पक्षात जाणं टाळलं आहे. त्यामुळे वाघ यांच्या भाजपात जाण्याच्या सुरु असलेल्या प्रयत्नानांना कितपत यश मिळंत हे पाहावे लागणार आहे.