JP Gavit ON CM Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

J.P. Gavit On CM Shinde : माजी आमदाराने मुख्यमंत्री शिंदेंनाच उभं केलं आरोपीच्या पिंजऱ्यात; प्रकरण चिघळणार?

Sampat Devgire

Nashik News, 29 August : राज्यात पेसा ॲक्ट (PESA)अंतर्गत आदिवासी भरती रखडली आहे. त्या संदर्भात सरकारकडून सर्वोच्च न्यायालयातील खटल्याचा संदर्भ दिला जात आहे. त्यामुळे हे प्रकरण चिघळले आहे. बुधवारी यासंदर्भात नाशिक शहरात मोठे आंदोलन झाले.

यावेळी आंदोलनाचे नेते माजी आमदार जे. पी. गावित (J.P Gavt) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. आदिवासींच्या नोकर भरतीचा अडसर मुख्यमंत्री शिंदे बनल्याचे संकेत माजी आमदार गावित यांनी दिले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील आदिवासी राज्य सरकार आणि भारतीय जनता पक्षावर नाराज आहेत. पेसा कायद्यातील तेरा जिल्ह्यातील रोखलेली भरती यासाठी मोठे निमित्त ठरले आहे. यावरून सध्या आदिवासी विरुद्ध राज्य सरकार असे चित्र आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

अशातच माजी आमदार गावित यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. खुल्या प्रवर्गांबरोबरच आदिवासींची भरती सुरळीत सुरू होती. मात्र, यामध्ये अचानक भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकारी भालचंद्र राठोड यांनी या भरतीत वाटा मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात केली. राठोड हे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shidne) यांचे निकटवर्तीय आहेत. आदिवासींच्या भरतीचा मार्ग रोखणारी व्यक्ती मुख्यमंत्र्यांचा माणूस आहे, असा आरोप त्यांनी केला.

आंदोलनात राज्य शासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. आंदोलकांनी राज्य शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. तर आता माजी आमदार गावित यांच्या आरोपाने आदिवासी आंदोलनाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. या आंदोलनाला राज्य शासनाकडून सुरुवातीला फारसे महत्त्व देण्यात आले नव्हते. त्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाला आदिवासी मतदार दुरावण्याची भीती वाटली. त्यामुळे भाजपने (BJP) देखील आंदोलनात भाग घेतला.

विधानसभा निवडणुका तोंडावर असताना नाराज झालेले आदिवासी आणि त्यातच माजी आमदार गावित यांनी केलेला आरोप यामुळे महायुती बचावात्मक स्थितीत येऊ शकते. काल यासंदर्भात राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Dr. Vijayakumar Gavit) हे आंदोलकांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यांनी आंदोलकांशी चर्चाही केली.

मात्र, ठोस आश्वासन मिळत नसल्याने आंदोलक मंत्री गावित यांना जुमानले नाहीत. मंत्री गावित बैठक संपवून निघत असताना आंदोलकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. एकंदरीतच आदिवासींचे हे आंदोलन राज्य शासनाला अडचणीचे ठरू लागले आहे. आता माजी आमदार गावीत त्यांनी मुख्यमंत्र्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्यामुळे पुढे काय होते, हा चर्चेचा विषय आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT