Sanjay Chhallare, Bhausaheb Wakchaure News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics : नगर जिल्ह्यात ठाकरेंची ताकद वाढणार ; भाऊसाहेब वाकचौरे अन् काँग्रेसचे छल्लारे गुरुवारी शिवबंधन बांधणार

सरकारनामा ब्यूरो

राजें त्रिमुखे

Ahmednagar News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी मतदारसंघ आणि उमेदवारांच्या चाचपणीच्या कामाला लागली आहेत. याचाच एक भाग म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यानुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा करत नव्याने पक्षात येणाऱ्यांच्या हातात शिवबंधन बांधून पक्षप्रवेश सुरू केला आहे. नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभेच्या दृष्टीने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा पक्ष प्रवेश मोठा चर्चेत असून बुधवारी (२३ ऑगस्ट) तो दुपारी १२ वाजता 'मातोश्री'वर पार पडणार आहे.

माजी खासदार वाकचौरे यांचा शिवसेना (Shivsena) प्रवेश चर्चेत असतानाच श्रीरामपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांचाही उद्याच पक्ष प्रवेश होणार असून छल्लारे यांचा ठाकरे गटातील प्रवेश काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. छल्लारे यांच्या पक्ष प्रवेशात श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांची महत्वाची भूमिका मानली जाते. राखीव असलेल्या श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसचे (Congress) लहू कानडे हे विद्यमान आमदार आहेत.

भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय छल्लारे यांचा 'मातोश्री'वर पक्ष प्रवेश एकाच दिवशी असला तरी साडेअकरा वाजता छल्लारे यांचा तर त्यानंतर स्वतंत्रपणे बारावाजेनंतर वाकचौरे यांचा पक्ष प्रवेश होईल. पक्ष प्रवेश करणारे दोन्ही नेते श्रीरामपूर मधून निघणार असले तरी त्यांच्या वाहनांचे ताफे स्वतंत्र आहेत. दोन्ही नेत्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता असून शेकडोच्या संख्येने चारचाकी वाहने 'मातोश्री'च्या दिशेने भल्या पहाटे चारच्या सुमारास कूच करणार आहेत.

या दोन्ही प्रवेशामुळे नगर जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत १३ खासदार गेले आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात पक्ष संघटना बळकट करण्यासह तगडा उमेदवार ठाकरे गटाला शोधावा लागणार आहे. त्यामुळे त्यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT