Sujay Vikhe Vs Nilesh Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sujay Vikhe Patil : आजोबांनंतर नातवाची निवडणूक याचिका; लंकेच्या निवडीला विखेंकडून आव्हान !

Pradeep Pendhare

Nagar News : खासदार नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुजय विखे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली.सुजय विखे यांनी नीलेश लंके यांना न्यायालयात आव्हान दिल्याने त्यांच्याच घराण्यातील इतिहासाची पुनरावृत्ती झाली. देशभर गाजलेला 1991 मधील विखे-गडाख निवडणूक खटल्याला यानिमित्ताने उजळणी मिळाली.

आजोबा, बाळासाहेब विखे यांच्यानंतर नातू सुजय विखे यांनी 33 वर्षानंतर पुन्हा एकदा उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे. विखे-गडाख खटल्याची झळ शरद पवार यांना देखील बसली होती.आता सुजय विखे यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेची झळ कोणाकोणाला बसणार याची चर्चा आहे.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांच्या अटीतठीशी लढाई झाली.नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी या निवडणुकीत विजय मिळवला.

मात्र सुजय विखे यांनी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली. संबंधित 40 ते 45 केंद्रावरील मतमोजणी योग्य पद्धतीने झाले नसल्याचा दावा सुजय विखे यांचा आहे.सुजय विखे यांनी यासाठी निवडणूक आयोगाकडे पडताळणी शुल्क देखील भरले आहे.

ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी सुजय विखे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नीलेश लंके आणि त्यांच्या प्रचाराकांनी केलेली भाषणे विखे परिवाराची खोटी बदनामी करणारे आहेत. तसेच नीलेश लंके यांनी दाखवलेल निवडणूक खर्च आणि प्रत्यक्षातील खर्च याचा ताळमेळ दिसून येत नाही. मुद्रित प्रचारातील साहित्याचे खर्च, त्यांनी दाखवलेला नाही. परिणामी लंकेने दाखवलेल्या निवडणुकीतील खर्चातील मर्यादेची उल्लंघन झाले आहे. आदी मुद्द्यांवर सुजय विखे यांनी ही याचिका दाखल केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या (Court) औरंगाबाद खंडपीठाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. सुजय विखे यांनी ही याचिका दाखल केल्यानंतर आजोबा,बाळासाहेब विखे यांनी 33 वर्षांपूर्वी दाखल केलेल्या याचिकेची पुनरावृत्ती झाली आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या विरोधात बाळासाहेब विखे यांची निवडणूक मैदानात 1991 मध्ये थेट लढाई झाली होती.

यशवंतराव गडाख ही निवडणूक जिंकले होते. परंतु बाळासाहेब विखे यांनी या निवडीला न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयात बाळासाहेब विखे यांच्या बाजूने निकाल लागला. यशवंतराव गडाख यांची निवड रद्द केली.

बाळासाहेब विखे यांचे नातू सुजय विखे यांनी 33 वर्षानंतर पुन्हा एकदा आपला पराभव न्यायालयात नेला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान दिले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. विखे-गडाख खटला 33 वर्षेपूर्वी देश पातळीवर गाजला होता. तसाच विखे-लंके खटला कोणता राजकीय रंग उधळतो, याची सध्या नगरमध्ये चर्चा आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT